बनावट नोटा : प्रकरणी तरुणाला अटक; दोनशे रूपयांच्या नोटा कलर प्रिंटरवर
राहत्या घरी कलर प्रिंटरने बनवत होता दोनशे रूपयांच्या नोटा
परभणी : भारतीय चलनातील दोनशे रुपयासारख्या बनावट नोटा तयार करून त्या नोटांचा चलनात वापर केल्याप्रकरणी एका १९ वर्षीय तरुणाला मानवत (जि.परभणी) पोलिसांनी मंगळवारी (१४ मार्च) रात्री नोटा बनवण्याच्या साहित्यासह अटक केली. विशाल संतोष खरात असे आरोपीचे नाव आहे. तो त्याच्या राहत्या घरी लोकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने भारतीय चलनाच्या २०० रुपये चलनाच्या बनावट नोटा कलर प्रिंटरने बनवत होता. या बाबत परभणीच्या स्थानिक गुन्हा शाखा पथकाला माहिती मिळाली होती. पोलिसांनी आरोपीच्या घरातून कलर प्रिंटर, २०० रुपयाच्या बनावट नोटा, पेपर व अन्य साहित्य जप्त करून त्या तरुणाला अटक केली. या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस नायक दिलावर खान रशीद खान पठाण यांच्या फिर्यादीवरून आरोपी विशाल खरात विरुद्ध मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक रमेश स्वामी तपास करीत आहे.