थेट बांधावर : गारपीटग्रस्त भागात खासदार जाधव, जिल्हाधिकारी गोयल यांची पाहणी
पूर्णा तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे सुरू, तात्काळ भरपाई अनुदानाची मागणी
परभणी : पूर्णा तालुक्यात शुक्रवारी झालेल्या वादळी वारा, अवकाळी पाऊस व गारपीटीने मोठा रब्बी पिके,फळबागांसह मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. विज पडून पाच जणांचा मृत्यू झाला. शनिवारी (१८ मार्च) जिल्हाधिकारी आंचल गोयल, खासदार संजय जाधव यांच्यासह महसूल, कृषी अधिकारी व पथकाने थेट बांधावर जाऊन पाहणी केली. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.
शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास जिल्ह्यातील पूर्णा, गंगाखेड, सोनपेठ तालुक्यात गारपीट झाली. विज पडून पाच जणांचा मृत्यू झाला. पूर्णा तालुक्यातील आवई, सुहागन, बरबडी, देगांव, सुरवाडी शिवाराला अवकाळीचा मोठा फटाका बसला. उभा ऊस, हळद, गहू, ज्वारी, भाजीपालासह पपई, आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी आदी फळबागा मालमस्तेसह पशुधनाचीही हानी झाली होती. शनिवारी सकाळपासून खासदार संजय जाधव, जिल्हाप्रमुख विशाल कदम आदी लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागासह पिक फळबागांची पहाणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी आंचल गोयल, उपजिल्हाधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार माधवराव बोथीकर, नायब तहसिलदार नितीश कुमार, मस्के, महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. दरम्यान, अवकाळी व गारपीटीमुळे झालेले नुकसान कधीह भरुन निघणारे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी खचुन जाऊ नये. स्थानिक अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या असल्याचे खासदार जाधव यांनी सांगितले.