बोगस खत विक्री प्रकरणी ८२५ विक्रेत्यांवर गुन्हे : कृषीमंत्री अब्दुल सत्तार

बोगस खत विक्री प्रकरणी ८२५ विक्रेत्यांवर गुन्हे

तारांकित प्रश्नावर कृषी मंत्री सत्तार यांचे उत्तर, आमदार बाबाजानी दुर्राणी यांची माहिती

बोगस खत विक्री प्रकरणी ८२५ विक्रेत्यांवर गुन्हेपरभणी : बोगस खत विक्री प्रकरणात राज्यातील ८२५ खत विक्रेत्यांवर ७७ पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच; हजारो कोटीं रूपयांचे बोगस खते उत्पादन करणार्‍या कंपनीच्या गुजरातमधील मालकास पंधरा दिवसात अटक करण्यात येणार आहे, असे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले.
बोगस खत विक्री प्रकरणी उपस्थित केलेल्या तारांकीत प्रश्नाला उत्तर देताना कृषीमंत्री सत्तार यांनी सभागृहात ही माहिती दिल्याचे पाथरी (जि.परभणी) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शनिवारी (१८ मार्च) सांगितले. राज्यात विशेषतः परभणी जिल्ह्यासह अनेक ठिकाणी बनावट खत विक्री करण्यात येत असल्याबाबत आमदार दुर्राणी, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, राजेश राठोड, अशोक उर्फ भाई जगताप, अभिजीत वंजारी, जय्यंत आसगावकर, डॉ. वजाहत मिर्झा, सतेज उर्फ बंटी पाटील, डॉ. प्रज्ञा सातव यांनी या प्रश्नावरील चर्चेत भाग घेतला. परभणी जिल्ह्यासह अनेक ठिकाणी मे.पृथ्वी खेतीवाडी केंद्र, भावनगर, गुजरात या कंपनीने ग्रीन गोल्ड फर्टीलायजर या नावाने खत विक्री करून शेतकर्‍यांची फसवणुक केल्याप्रकरणी परभणी जिल्ह्यात सन २०२२ मध्ये वा त्या दरम्यान गुन्हे नोंदविण्यात आले आहे, हे खरे आहे का? असल्यास जिल्ह्यातील कृषी दुकानदारांकडून ई-पीओएस (ई-पॉस) मशीनचा वापर न करता शेतकर्‍यांना खताची विक्री केली जात असून भावफलक न लावल्याने खते, बियाणे किती प्रमाणात उपलब्ध आहेत याची माहिती शेतकर्‍यांना मिळत नसल्याचे जानेवारी २०२३ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय? असा सवाल करण्यात आला होता. तसे असल्यास हजारो कोटी रूपयांंची बनावट खत विक्री करणारी कंपनी कृषी विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या संगनमताने हा गैरव्यवहार करत असल्याने याबाबत मुख्य सचिव यांच्या स्तरावरून सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी जानेवारी २०२३ मध्ये वा त्या दरम्यान केली आहे, हे ही खरे आहे काय? असे विचारण्यात आले. त्यावर कृषीमंत्र्यांनी उत्तर दिले आहे, अशी माहिती आमदार दुर्राणी यांनी दिली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!