मानधनासाठी लाच : गटविकास अधिकाऱ्यासह दोघे एसीबीच्या जाळ्यात

मानधनासाठी लाच : गटविकास अधिकाऱ्यासह दोघे एसीबीच्या जाळ्यात

मानवतमध्ये चार हजाराची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले, एसीबी पथकाची कारवाई

परभणी : मानवत (जि.परभणी) पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी स्वप्नील शिवाजीराव पवार व विस्तार अधिकारी संदीप बाळासाहेब पवार या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (२७ मार्च) दुपारी सापळा रचून चौदा हजार रुपयांच्या मानधनसाठी चार हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदाराने मानवत पंचायत समितीमध्ये राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत ‘आमचा गाव, आमचा विकास ‘ उपक्रमांतर्गत प्रशिक्षण दिलेले होते. या कामाचे मानधन चौदा हजार रूपये श्री.पवार यांच्या खासगी बँक खात्यात जमा झाले होते. हे मानधन घेण्यासाठी तक्रारदाराने दोन्ही अधिकार्‍यांना भेटून मागणीचा पाठपुरावा केला. वरिष्ठांकडे लेखी तक्रार करून सुद्धा मानधनाची रक्कम मिळाली नाही. श्री.पवार यांनी चौदा हजार रूपये रक्कमेचा देय चेक न देता, दहा हजार रूपये रक्कमेचा स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्याचा चेक देऊन, चार हजार रूपये कमिशन स्वरूपात लाचेची रक्कम स्वीकारली, तर विस्तार अधिकारी पवार यांनी मागणी केलेल्या व स्वीकारलेल्या लाचेच्या रक्कमेस प्रभारी गटविकास अधिकारी पवार यांनी पंचासमक्ष प्रोत्साहन देऊन संमती दिली. या प्रकरणी दोन्ही अधिकार्‍यांना ताब्यात घेतलेले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली किरण बिडवे, सदानंद वाघमारे, पोनि बसवेश्वर जकीकोरे, चंद्रशेखर निलपत्रेवार, मिलिंद हनुमंते, अतुल कदम, शेख मुख्तार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!