हळदीतून एकरी अडीच लाखांचे उत्पन्न; आडळकरांचा सेंद्रिय शेती प्रयोग यशस्वी

हळदीतून एकरी अडीच लाखांचे उत्पन्न; आडळकरांचा सेंद्रिय शेती प्रयोग यशस्वी

हेमंतराव आडळकरांचा सेलूजवळील वाकी शिवारात हळदीचा प्रयोग, दोनशे क्विंटल हळकुंड तयार 

परभणी : सलग दोन वर्षाच्या अपयशानंतर सेलू (जि.परभणी) येथील माजी नगराध्यक्ष व प्रयोगशील शेतकरी हेमंतराव आडळकर यांना यंदा सेंद्रिय हळद पिकातून एकरी अडीच लाखांचे उत्पन्न घेण्यात यश आले. यामुळे आगामी काळात सेलू परिसरातही हळद लागवडीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
वाकी शिवारातील शेतीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून आडळकर हळद पीक घेत आहेत. मात्र, योग्य तंत्रज्ञान व मार्गदर्शनाचा अभाव, निसर्गाचा लहरीपणा यामुळे त्यांना सलग दोन वर्ष अपयशाला सामोरे जावे लागले. उत्पन्नापेक्षा उत्पादनासाठी लागेला अधिकचा खर्च सहन करावा लागला. परंतु; यंदाच्या हंगामात साडे सहा एकरमध्ये मोठ्या उमेदीने त्यांनी सेलम जातीच्या हळदीच्या बेण्यांची लागवड केली. लागवडीपूर्वी एकरी दहा ट्रॅक्टर ट्रॉली शेणखताचा वापर केला. सेंद्रिय खत, कृषी विद्यापीठातून उपलब्ध जैविक खत, खनिज द्रव्ये यासोबतच दही, गुळ, चुनपीठ, वडाखालीची माती, राननिंबाचा पाला, पाच किलो सडका गुळ याचे मिश्रखत तयार करून वापरले. ड्रिचिंगद्वारे खनिज द्रव्ये दिली. याचा परिणाम हळद चांगलीच पोसत बहरत गेली. काढणीला कच्च्या हळदीचा एक गड्डा साडे सात किलो वजनाचा भरला. कच्ची हळद शिजवून वाळवून घेतली. एकरी पस्तीस ते चाळीस क्विंटल प्रमाणे साधारण दोनशे क्विंटल तयार हळकुंड आडळकरांना उत्पादन झाले आहे.

सेलू तालुक्यातील वालूर परिसरात दोनशेवर छोटे-मोठे शेतकरी हळदीचे पीक घेतात. यामध्ये राजेंद्र तोष्णीवाल, कृष्णा सोलापुरे, संतोष सोनी, रितेश मुंदडा, अब्दुल रौफ, इस्माईल अन्सारी, शंकर डुमे, निसार पठाण, मारोती कलाल आदी शेतकऱ्यांचे लागवड क्षेत्र मोठे आहे. गेल्या काही वर्षात वालूरचे सखाराम रेवणवार, आनंद शिनगारे, नागेश आंधळे यांनी हळद प्रक्रिया उद्योग सुरू केले आहेत.‌ स्थानिक खरेदीमुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

हळदीतून एकरी अडीच लाखांचे उत्पन्न; आडळकरांचा सेंद्रिय शेती प्रयोग

वालूरपेक्षा सेलू परिसरात हळद लागवडीचे प्रमाण अत्यल्प आहे. आपणसुद्धा पहिल्यांदा प्रयोग केला. दोन वर्षापासून हळद लागवड करीत आहे. मात्र, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला. शिकायला खूप मिळाले. यंदा खर्च वजा जाता एकरी अडीच लाखांचे उत्पन्न झाले. नवनवीन तंत्रज्ञान आणि सेंद्रिय खतांचा योग्य वापर यासाठी महत्त्वपूर्ण ठरला. येत्या हंगामात लागवड क्षेत्र वाढविणार आहे. यातून सेलू परिसरातही हळद उत्पादनाला निश्चित चालना मिळेल, अशी खात्री आहे.

– हेमंतराव आडळकर, प्रयोगशील शेतकरी, सेलू जि.परभणी

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!