कवी विश्वास वसेकरांना ‘काव्य जीवनगौरव पुरस्कार’ ; रविवारी पुण्यात वितरण
ॲड.प्रमोद आडकर यांची माहिती, डॉ.ज्ञानेश्वर मुळे, डॉ.श्रीपाद जोशी आदी मान्यवरांची उपस्थिती
पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानचा २०२३ या वर्षाचा ‘काव्य जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ कवी, लेखक प्रा.विश्वास वसेकर यांना माजी परराष्ट्र सचिव व राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते रविवारी (१६ एप्रिल) प्रदान करण्यात येणार आहे.
संयोजक तथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड.प्रमोद आडकर यांनी ही माहिती दिली. रंगत-संगत प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने दरवर्षी एका ज्येष्ठ कवीस ‘काव्य जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान केला जातो. यापूर्वी ज्येष्ठ कवयित्री सरिता पत्की, ज्येष्ठ कवी डॉ.विठ्ठल वाघ, गझलकार रमण रणदिवे, हेमा लेले, अरुण म्हात्रे, डॉ. अश्विनी धोंगडे, आसावरी काकडे, बण्डा जोशी व प्रभा सोनवणे यांना प्रदान करण्यात आलेला आहे.
समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संशोधक व समीक्षक डॉ. अविनाश आवलगावकर व अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी हे उपस्थित रहाणार आहेत. पुरस्काराचे स्वरुप सन्मानपत्र,शाल, श्रीफळ असे आहे. सन्मानपत्राचे लेखन व वाचन ज्येष्ठ कवी उद्धव कानडे करणार आहेत. सूत्रसंचालन निवेदिका तथा पत्रकार शिल्पा देशपांडे ह्या करणार आहेत. रविवारी, १६ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वाजता पत्रकार भवन (२ रा मजला), गांजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे हा समारंभ होत आहे. उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.