परभणी मेडिकल कॉलेजला अडथळे आणू नका : खासदार संजय जाधवांचा राज्यसरकारला इशारा

परभणी मेडिकल कॉलेजला अडथळे आणू नका : खासदार संजय जाधवांचा राज्यसरकारला इशारा

शासकीय समितीकडून राज्यसरकारला  नकारात्मक अहवाल : खासदार जाधवांचा आरोप; व्यापक बैठक बोलावून जनआंदोलन करणार

परभणी : येत्या जुलैपासून शंभर विद्यार्थी प्रवेशासह परभणीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणे अपेक्षित असताना, शासकीय समितीने याबाबत किरकोळ बाबींवरून नकारात्मक अहवाल राज्यसरकारकडे सादर केला आहे, असा आरोप खासदार संजय जाधव यांनी केला आहे. सारख्याच अटी व शर्ती असताना खाजगी वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता मिळते आणि शासकीयला का नाही? असा सवाल करीत,  मेडिकल कॉलेजमध्ये अडथळे आणू नका; अन्यथा महाराष्ट्र दिनापासून व्यापक जनआंदोलन करण्याचा इशारा शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.
या संदर्भात मंगळवारी (२५ एप्रिल) पत्रकार परिषदेत खासदार जाधव यांनी भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी आमदार सुरेश वरपूडकर, माजी महापौर भगवानराव वाघमारे, डॉ. विवेक नावंदर, पंजाबराव देशमुख समशेर वरडपूडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
परभणीचे शासकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी संपूर्ण तपासण्या झाल्या. तयारीदेखील झालेली असताना, केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन परभणीचा अहवाल नकारात्मक देण्यात आल्याचा आरोप खासदार जाधव यांनी केला. एक मे रोजी पालकमंत्री परभणीत आले, तर त्यांना शासकीय ध्वजारोहण करू देणार नाही, असा इशाराही जाधवांनी दिला.‌ राजकीय विरोधातून परभणीच्या शासकीय महाविद्यालयाच्या वाटेत अडथळे आणले जात असल्याचा आरोप करीत या प्रकरणी अधिष्ठाता यांनी अपील केले आहे. त्या नुसार पुन्हा कमिटी तपासणीला येणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आयटीआय आणि शासकीय नर्सिंग कॉलेजची इमारत रिकामी करून दिली जात आहे, असेही त्यांनी सांगितले. गोरगरीब व सामान्य नागरिकांना सर्व आरोग्य सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे आता सर्वांनी एकत्र येऊन पुन्हा उठाव करण्याची गरज आहे. या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी लवकरच एक व्यापक बैठक बोलावून एक मेपासून शिंदे-फडणवीस सरकार विरोधात करावयाच्या जनआंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात येईल, असे जाधव यांनी या वेळी स्पष्ट केले.


अध्यक्षपदी माधव लोकुलवार विजयी, सिरसकर सचिव : परभणी पोलिस पतसंस्था पदाधिकारी निवडणूक

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!