सेलू बाजार समिती : चार तासांत ४१.९८ टक्के मतदान; केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची लगबग 

सेलू बाजार समिती : चार तासांत ४१.९८ टक्के मतदान; केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची लगबग 

पोलिस बंदोबस्त चोख, उमेदवारांसह नेतेमंडळींच्या भेटी 

सेलू जि.परभणी : सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारी (२८ एप्रिल) रोजी सकाळी आठ वाजता सेलू येथील केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. बारा वाजेपर्यंत ४१.९८ टक्के मतदान झाले आहे. सहकार संस्था मतदारसंघात ५५.१८ टक्के मतदान झाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत थारकर यांनी ही माहिती दिली. 

बाजार समितीसाठी एकूण २०३२ मतदार मतदान पात्र आहेत. त्यापैकी सकाळी दहा वाजेपर्यंत दोन तासात २४४ (१२ टक्के) मतदान झाले. तर बारा वाजेपर्यंत ८५३ ( ४१.९८ टक्के) मतदान झाले आहे.

दर दोन तासानंतर मतदानाची आकडेवारी दिली जात आहे. सकाळी आठ ते बारा या चार तासात झालेल्या मतदानाची आकडेवारी अशी : सहकारी संस्था मतदारसंघ : एकूण मतदान ६२७, झालेले मतदान ३४६, टक्केवारी ५५.१८, ग्रामपंचायत मतदारसंघ : एकूण मतदान ६४५, झालेले मतदान ३०९, टक्केवारी ४७.९०, व्यापारी व आडते मतदारसंघ : एकूण मतदान १८७, झालेले मतदान ८८, टक्केवारी ४७.०५, हमाल व तोलारी मतदारसंघ : एकूण मतदान ५७३, झालेले मतदान ११०, टक्केवारी १९.२०, एकूण मतदान २०३२, झालेले मतदान ८५३, टक्केवारी ४१.९८

मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची लगबग

बाजार समिती निवडणुकीत १८ जागांसाठी ३८ उमेदवार रिंगणात आहेत. भारतीय जनता पक्ष प्रणित श्री तुळजाभवानी शेतकरी विकास पॅनल व शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे जिवाजी महाराज शेतकरी विकास पॅनलमध्ये सरळसरळ लढत आहे. या पार्श्वभूमीवर एकेक मतदान महत्त्वाचे आहे. त्यासाठी मतदान केंद्राबाहेर विविध पॅनल, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पेंडॉल टाकले आहेत. कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे. नेतेमंडळींनी याठिकाणी भेटी सुरू ठेवल्या आहेत. ग्रामीण भागातील मतदार असल्यामुळे दुपारनंतर मतदानाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, मतदान केंद्राबाहेर परिसराला जत्रेचे स्वरूप आले असून, पोलिसांचा बंदोबस्त चोख आहे.

 

 

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!