प्रस्थापितांना दणका : सेलू बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता; नव्या कारभाऱ्यांना संधी
सेलू, जि.परभणी : सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीचे १८ पैकी १० उमेदवार विजयी झाले असून, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास नऊ जणांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाच्या पॅनलला केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले आहे. दोन जागी अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान, या निवडणुकीत प्रस्थापितांना मोठा धक्का बसला आहे. बाजार समितीत सत्ता परिवर्तन घडविल्यामुळे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून विजयाचा जोरदार जल्लोष साजरा केला जात आहे. दरम्यान, नवनिर्वाचित अठरा संचालकांमध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र लहाने वगळता, जवळपास सर्वच नव्या चेहऱ्यांना संधी मिळाल्याचे निकालावरून दिसून येत आहे.
१८ संचालकांच्या जागांसाठी ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. भारतीय जनता पक्ष प्रणित श्री तुळजाभवानी शेतकरी विकास पॅनलने ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली होती, तर महाविकास आघाडी प्रणित श्री जिवाजी महाराज शेतकरी विकास पॅनलने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र लहाने, कॉंग्रेसचे सेलू तालुकाध्यक्ष हेमंतराव आडळकर, चक्रधर पौळ, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रामनाना पाटील खराबे, माजी मुख्यप्रशासक रणजीत गजमल यांच्या नेतृत्वाखालील चुरशीची लढत दिली. त्यात महाविकास आघाडीने दहा जागा जिंकून बाजार समितीत निर्विवाद सत्ता प्रस्थापित केली आहे. महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारात सहकार संस्था मतदारसंघातून पुरुषोत्तम पावडे (२९७), राजेंद्र लहाने (२९३), वर्षा सोळंके (३१५), छाया राऊत (३२८), प्रकाश मुळे (३०९), ग्रामपंचायत मतदार संघ : नामदेव डख (३३१), चक्रधर पौळ (३२८), गोरखनाथ भालेराव(३३९), अनिता ताठे (३१२), हमाल व तोलारी मतदार संघात अनिल बरडे (२५४) यांचा समावेश आहे.
भाजपला सहा जागा, दोन अपक्षांचा विजय
भारतीय जनता पक्ष प्रणित श्री तुळजाभवानी शेतकरी विकास पॅनलचे सहकार संस्था मतदारसंघात अकरा पैकी सहा उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारात सभापतीपदाचे दावेदार डॉ.संजय रोडगे (३२१) यांच्यासह गणेश आकात (२९०), दत्ता कदम (२९१), प्रसाद डासाळकर (३१६), अनिल पवार (२८२), गोकर्णा पडघन (३१७) यांचा समावेश आहे. व्यापारी व आडते मतदार संघातून अपक्ष उमेदवार शैलेश तोष्णीवाल (१२१), रामेश्वर राठी (११९) विजयी झाले आहेत.
बाजार समितीसाठी शुक्रवारी, २८ एप्रिल रोजी ९७.३४ टक्के मतदान झाले होते. तहसील कार्यालयात सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. साडे बारा वाजता निकालाचे चित्र स्पष्ट झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी काम पाहिले. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सहकारी संस्था मतदार संघात सर्वसाधारण ६१६ पैकी ४५ मते बाद ठरली, महिला राखीव मतदार संघात पाच, इतर मागासवर्गीय मतदार संघात १३, तर विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघात एकूण १० मते बाद ठरली. ग्रामपंचायत मतदार संघात सर्वसाधारण मतदार संघात ६३६ पैकी १६, अनुसुचित जाती-जमाती मतदार संघात २३, आर्थिक दुर्बल घटक मतदार संघात २०, व्यापारी व आडते मतदार संघात एक, तर हमाल व तोलारी मतदार संघात ८ मते बाद ठरली.