औषधी बाहेरून : उपचाराचा ‘रेफर’ पॅटर्न कायम; स्वच्छतेची ‘ऐशीतैशी‌’, सेलू उपजिल्हा रुग्णालयातील चित्र

औषधी बाहेरून : उपचाराचा ‘रेफर’ पॅटर्न कायम; स्वच्छतेची ‘ऐशीतैशी‌’, सेलू उपजिल्हा रुग्णालयातील चित्र

सामाजिक कार्यकर्त्यांचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गोळेगावकरांना निवेदन

सेलू जि.परभणी : येथील उपजिल्हा रुग्णालयात घाणीचे साम्राज्य पसरले आहे; तसेच प्रसुती व इतर रूग्णांवर उपचार न करता सरळ परभणीला रेफर केले जाते. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सिझेरीन व इतर रूग्णांना बाहेरुन औषधे आणावयास सांगितले जात आहे.

या गैरसोयींबाबत प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डाॅ.जनार्धन गोळेगांवकर यांना सोमवारी (८ मे) निवेदन देण्यात आले आहे. समस्यांवर ताबडतोब उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या एका शिष्टमंडळाने डॉ.गोळेगावकरांना सोबत घेऊन रुग्णालयातील घाण प्रत्यक्ष दाखवली. प्रश्नांचा भडीमार केला.‌ डॉ.गोळेगावकर निरुत्तर झाले. पठाण लालूखान, शेख महेमुद, सय्यद नियाजोद्दिन, रफीक बेलदार, शेख साजीद, शेख अजीज, शेख अमजद बागवान, शेख मुख्तार यांचा शिष्टमंडळात समावेश होता. या संदर्भात जिल्हाशल्यचित्सक जिल्हाधिकारी परभणी यांची भेट घेणार आहोत, असे शेख महेमुद यांनी सांगितले.

 

साफसफाई अभावी रुग्णालयाची अवस्था अत्यंत खराब झालेली आहे. जागो जागी दुर्गंधी पसरलेली आहे. सद्यस्थितीमध्ये रुग्णालयाचा परिसर तसेच अंतर्गत विभागातील संडास, बाथरुम, वॉश बेसीन अत्यंत खराब झालेली आहे. प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना सिझेरीनसाठी लागणारी औषधीसुध्दा उपलब्ध नाहीत. त्यासाठीचे साहित्य बाहेरुन मागविण्यात येते. यामुळे गरीब रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. रुग्णालयात दाखल होण्यासाठी आलेल्या रुग्णांना इतरत्र रेफर करण्यात येते. या संदर्भात तात्काळ कार्यवाही करावी; अन्यथा रुग्णालयासमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!