पाणी बचतीचा संस्कार रुजवावा : प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर; सेलूतील ब्रह्माकुमारी विद्यालयात पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रम
सेलू जि.परभणी : मानवाच्या उज्ज्वल भविष्यासाठी वृक्ष लागवड करणे आणि पाण्याचा थेंब अन् थेंब वाचविण्याचा संस्कार रुजविण्याची गरज आहे, असे मत नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर यांनी मंगळवारी (३० मे) केले.
सेलू येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयात जागतिक पर्यावरण दिन व जल जन अभियानांतर्गत जनजागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्राचार्य कोठेकर बोलत होते. या वेळी उद्योजक रामप्रसाद घोडके, नंदकिशोर बाहेती अशोक काकडे, सेलू केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी सविता बहेन, सीमा बहेन, वैशाली बहेन, राधा बहेन, सारिका बहेन, इंजिनिअर बी.एस.कोलते, किशोर कटारे, कविता कटारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी किशोर व कविता कटारे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक ब्रह्माकुमारी सविता बहेन यांनी केले. सूत्रसंचालन सीमा बहेन यांनी केले. राधा बहेन यांनी आभार मानले. कार्यक्रमाला ब्रह्माकुमारी परिवार, विविध क्षेत्रांतील नागरिक, महिलांची उपस्थिती होती.