परभणीतील ‘पीएमश्री’ शाळांना निधीची प्रतीक्षा !

परभणीतील ‘पीएमश्री’ शाळांना निधीची प्रतीक्षा !

परभणी जिल्ह्यातील ११ शाळा, १९ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर

Authored By Babasaheb Helaskar

परभणी : केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या ‘पीएमश्री’ योजनेंतर्गत परभणीतील जिल्ह्यातील निजामकालीन  ११ जिल्हा परिषद शाळांची निवड झालेली आहे. या शाळांना पाच वर्षात प्रत्येकी १ कोटी ८८ लाखांचा निधी टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. एकूण १९ कोटी ८० लाखांचा निधी उपलब्ध होईल.  मात्र, दहा महिन्यांनतरही या शाळांना निधीची प्रतीक्षाच करावी लागत आहे.

परभणी तालुक्यातील दैठणा, सेलू : डासाळा, गंगाखेड : राणी सावरगाव, जिंतूर : केंद्रिय प्राथमिक शाळा चारठाणा, मानवत : इरळद व केंद्रीय प्राथमिक शाळा, मानवत, पाथरी : वडी व माळीवाडा, पाथरी, पूर्णा : अवई, पालम : पारवा, सोनपेठ : डिघोळ या ११ शाळांची पीएमश्री योजनेत निवड झाली आहे.

या योजनेतून शाळांचे चित्र पालटणार आहे. मात्र, निधी केव्हा, कधी, कसा मिळणार आणि पहिल्या टप्प्यात कोणती कामे हाती घेतली जातील. याबद्दल अजूनही स्पष्टता नाही, असे डासाळा येथील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुशील शिखरे यांनी सांगितले.व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थांचे उत्स्फूर्त सहकार्य, सदाशिव मुळी, सय्यद करीम, कीर्ती आंबेकर, पुष्पा नवले शितल बोरसे, ज्योती भागवत दीपा रायबोले, गणेश गायकवाड, सचिन कांबळे आदी सहयोगी शिक्षक शाळेत नावीन्यपूर्ण उपक्रम हिरीरीने राबवितात. त्यामुळे पीएमश्री योजनेतील निवड सार्थ ठरल्याचा आनंद ग्रामस्थांनी व्यक्त केला. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ११ शाळांचा चेहरामोहरा निश्चितच बदलणार आहे.

शिक्षकांच्या मार्गदर्शनात विविध उपक्रम व स्पर्धा परीक्षांमध्ये शाळेचे विद्यार्थी पात्र ठरतात. नुकतीच  विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या श्रीहरिकोटा येथील इस्रोमध्ये शैक्षणिक विमान सहलीसाठी निवड झाली होती. आता पीएमश्री योजनेतून शाळा आणखी आनंददायी होणार आहे. सर्वांना उत्स्कूता लागली आहे. – स्नेहल गजमल, विद्यार्थिनी

 

रोजगारक्षम व कौशल्य संवर्धन शिक्षणासाठी खास अभ्यासक्रमावर या योजनेअंतर्गत भर दिला जाणार आहे हे विशेष.‌ यामुळे शाळांमधील विविध उपक्रमांना बळ मिळेल.‌ डासाळा शाळेला एक‌ आदर्श मॉडेल स्कूल करण्याचा ग्रामस्थांचा प्रयत्न आहे. – रामनाना पाटील खराबे, माजी जि.प.सदस्य, डासाळा

 

पहिली ते आठवीपर्यंत ३४३ विद्यार्थी संख्या आहे. अकरापैकी पाच वर्गखोल्या निजानकालिन आहेत. या योजनेअंतर्गत शाळेच्या निवडीचे श्रेय शाळा समिती, शिक्षकांच्या मेहनतीला तसेच; विद्यार्थ्यांना आहे. या संधीचे सोने करण्यासाठी सर्वजण कटीबद्ध आहोत. – सुशील शिखरे, मधुकर काष्टे अध्यक्ष व सचिव शाळा समिती, डासाळा

 

 

 

 

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!