SSC Results : मोरेगावच्या ऋतुजाला व्हायचयं ‘अंतराळवीर’; दहावीच्या परीक्षेत ‘न्यू मॉडर्न’ मधून सर्वप्रथम
न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूलचा निकाल शंभर टक्के, गुणवंतांचे संस्थेच्या वतीने कौतुक
सेलू जि.परभणी : येथील न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या ऋतुजा प्रवीण कुंभकर्ण ह्या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत 97.20 टक्के गुण मिळवत घवघवीत यश प्राप्त केले आहे. ‘”अंतराळवीर व्हायचयं” असे ऋतुजाने ठरवलं आहे. संस्थेच्या वतीने संचालक साईराज बोराडे यांनी ऋतुजासह शाळेच्या गुणवंतांचा व पालकांचा यथोचित सन्मान केला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या ऋतुजा प्रवीण कुंभकर्ण हीने 97.20 टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले. तिचे या यशामुळे सर्वत्र कौतक होत आहे.
ऋतुजा ही सेलू तालुक्यातील मोरेगाव येथील ग्रामीण भागातील विद्यार्थिनी आहे. इयत्ता पहिलीपासून तीने प्रथम क्रमांक पटकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. विविध स्पर्धा परीक्षेतही तीने अव्वल स्थान पटकावले आहे. अंतराळवीर होऊन संशोधन करण्याचे स्वप्न बाळगून ऋतुजाने प्रामाणिकपणे तयारी सुरू केली आहे.
मोरेगावचे माजी सरपंच सुभाषराव कुंभकर्ण यांची ऋतुजा नात असून, आजोबाप्रमाणे शैक्षणिक व सामाजिक कार्यात अगेसर असते. ग्रामीण भागात राहून ऋतुजाने मिळवलेल्या यशाबद्दल यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष मुकेशराव बोराडे, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, संचालक साईराज बोराडे, प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी यांच्यासह विविध स्तरांतून ऋतुजाचे कौतुक होत आहे.
शाळेचा निकाल शंभर टक्के
न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के आहे. शाळेतून प्रथम क्रमांक ऋतुजा प्रविण कुंभकर्ण (97.20), द्वितीय : आदेश बापुराव कदम (96.60) तृतीय क्रमांक अंकिता गोविंद तुडमे (95.80) व प्रतीक रामप्रसाद घोडके (95.80) यांनी पटकावला आहे.16 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांवर गुण मिळालेले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मुकेशराव बोराडे, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, संचालक साईराज बोराडे, प्राचार्य, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.