शासन आपल्या दारी : सेलूतील दोन हजार ४८४ लाभार्थ्यांना लाभ
परभणी : महसूल, कृषी, पंचायत समिती, नगर पालिका, पशु संवर्धन, शिक्षण, आरोग्य, महावितरण, एकात्मिक बालविकास आदी विभागांतर्गत सेलू ( जि.परभणी) तालुक्यातील दोन हजार ४८४ लाभार्थ्यांना शुक्रवारी आयोजित ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत लाभ देण्यात आला.
श्रीसाईबाबा मंदिर सभामंडपात हा कार्यक्रम झाला. या वेळी आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, जिल्हाधिकारी आंचल गोयल, उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार दिनेश झांपले, गटविकास अधिकारी विष्णू मोरे, माजी आमदार हरिभाऊ लहाने, डॉ.संजय रोडगे, डॉ.संजय लोंढे, देविदास जाधव, दशरथ तेलंगरे आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांच्या गतिमान अंमलबजावणीसाठी राज्य शासनामार्फत ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी या अभियानांतर्गत विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गोयल व आमदार बोर्डीकर यांनी यावेळी केले. यावेळी महसूल ९८५, कृषी ९२, पंचायत समिती एक हजार २७०, नगर परिषद ३७, पशु संवर्धन १२, शिक्षण ४८, आरोग्य १५, एकात्मिक बालविकास विभाग २०, महावितरण पाच आदींसह जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागामार्फत तब्बल दोन हजार ४८४ लाभार्थ्यांना विविध योजनेचा लाभ देण्यात आला. तसेच; २१० लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमस्थळी विभागनिहाय स्टॉल लावून शासकीय योजनेची माहिती नागरिकांना देण्यात आली.
राष्ट्रीय योगासन स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाला कांस्यपदक ; सेलूतील शिल्पा पिंपळेंचा सहभाग