दक्षिण आफ्रिकेतील स्पर्धेत सेलूच्या संतोष गायकवाडांना ब्राँझ पदक
९० किलोमीटर धावण्याच्या शर्यतीत मिळवले यश
परभणी : जिल्ह्यातील सेलूचे भूमीपूत्र तसेच श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे माजी विद्यार्थी, शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव संतोष उमेशराव गायकवाड यांनी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या ९० किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत ब्राँझ पदक मिळविले आहे.
दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मेरेथॉन अल्टीमेट असोसिएशन यांच्यावतीने ११ जून रोजी आयोजित केलेल्या कॉम्रेड मॅरेथॉन अल्टीमेट ह्युमन रेस या धावण्याच्या स्पर्धेत ९० किमी धावणे स्पर्धेत संतोष गायकवाड यांनी ब्राँझ पदक मिळवले. १० तास ४४ मिनिटं इतक्या वेळात त्यांनी ९० किमी अंतर पूर्ण केले.
यापूर्वीही विविध ठिकाणी झालेल्या धावण्याच्या स्पर्धेत गायकवाड यांनी अनेक पदके मिळवलेली आहेत. एक प्रशासकीय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत गायकवाड यांनी मिळविलेल्या यशाने देशाचे आणि सेलूचे नाव उंचावले आहे.
या यशाबद्दल वडील उमेशराव, आई आश्रावंती, बाळासाहेब गायकवाड, श्री केशवराज बाबासाहेब शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड.अनिरुद्ध जोशी, सचिव महेश खारकर, मुख्याध्यापक प्रदीप कौसडीकर, बी.यु.हळणे आदींसह शाळेतील शिक्षक तसेच विविध स्तरांतून गायकवाड यांचे अभिनंदन होत आहे.