सेलूतील सतीश नावाडेंना उत्कृष्ट संघटक पुरस्कार; टेनिसव्हॉलिबॉल महाराष्ट्र असोसिएशनच्या वतीने गौरव
परभणी : टेनिस व्हॉलिबॉल महाराष्ट्र असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी, ११ जून रोजी पनवेलमध्ये झाली. यावेळी गेल्या वर्षभरात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सेलू (जि.परभणी) येथील नूतन विद्यालयाचे क्रीडा शिक्षक व संघटनेचे जिल्हा सचिव सतीश नावाडे यांना जिल्हा उत्कृष्ट संघटक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या वर्षभरात परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय स्पर्धेच्या अनुषंगाने दोन सराव शिबिरांसह स्पर्धाही घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये नावाडे यांचा पुढाकार व सक्रियता उल्लेखनीय ठरली. याबद्दल त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याच कार्यक्रमात आशिष ओबेरॉय यांना उत्कृष्ट मार्गदर्शक पुरस्कार देण्यात आला.
या सभेत या वर्षात राज्य संघटनेच्या राज्यस्तरीय स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यात सब-ज्युनिअर ज्युनिअर स्पर्धा ऑगस्ट महिन्यात नागपूर, युथ व मिनी गटाच्या वाशिम, तर सिनियर गटाच्या जळगाव, शालेय राज्य क्रीडा स्पर्धा अकोल्यात होणार आहेत, अशी माहिती राज्य सचिव गणेश माळवे यांनी दिली. या वेळी डॉ.संतोष निमुनकर, असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.व्यंकटेश वांगवाड, राज्य अध्यक्ष सुरेश रेड्डी क्यातमवार, आनंद खरे, गणपतराव बालवडकर, गणेश माळवे, डॉ.धनंजय बेडदे, एन.डी. पखाले, डॉ.दिनेश शिंगारम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
परभणी मेडिकलच्या अपीलावर गुरुवारी दिल्लीत सुनावणी; प्रवेश प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता
कवी विश्वास वसेकरांच्या ‘जगण्याचा उत्सव’ला अर्जुनवाडकर पुरस्कार; २४ जूनला वितरण