प्रवेशोत्सव : मॅजिक शो, बोलक्या बाहुल्यांच्या खेळाने बच्चे कंपनी खूश; सेलूतील श्रीराम प्रतिष्ठानचा उपक्रम
सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने प्रवेशोत्सवानिमित्त गुरुवारी, १५ जून रोजी आयोजित स्मार्ट किड्स स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मॅजिक शो व बोलक्या बाहुल्यांचा खेळाने बच्चे कंपनी आनंदीत झाली.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रसिद्ध जादूगार अमित सोळंकी, संस्थेच्या सचिव डॉ.सविता रोडगे, डॉ.अपूर्वा रोडगे, डॉ.अजय बरसाले, गणेश काकडे, मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर, शालिनी शेळके, कार्तिक रत्नाला, रोझ आदी मान्यवर उपस्थित होते.
स्मार्ट किड्स स्पर्धेत चित्रकला, डान्स, फॅन्सी ड्रेस, वन मिनीट टाॅक शो उपक्रमांचा समावेश होता. यामध्ये सर्वेश लिपणे याने प्रथम क्रमांक मिळविला. स्वानंद डाखोरे याने द्वितीय क्रमांक, तर स्पृहा लोया हिने तृतीय क्रमांक मिळविला. डॉ. अजय बरसाले यांनी मनोगत व्यक्त केले.
शाळा प्रवेशोत्सवानिमित्त शाळेच्या क्रीडांगणावर खास विद्यार्थ्यांकरिता मॅजिक शो व बोलक्या बाहुल्यांचा खेळ आयोजित केला होता. यामध्ये अमित सोळंकी यांनी विद्यार्थ्यांना आपल्या नाविन्यपूर्ण जादुच्या प्रयोगातून आनंदीत केले. सूत्रसंचालन संजय ठाकर यांनी, तर डिगांबर टाके यांनी आभार मानले.