चिन्मयी सुमित यांना चारठाणकर पुरस्कार प्रदान; सेलूतील महिला मंडळाचा उपक्रम
पुरस्काराचे २९ वर्ष, मान्यवर नागरिक, महिलांची उपस्थिती
सेलू (जि.परभणी) : येथील महिला मंडळाच्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘वीर महिला गीताबाई चारठाणकर पुरस्कार’ ज्येष्ठ सिनेनाट्य व दूरदर्शन कलावंत चिन्मयी सुमित यांना शुक्रवारी, १६ जून रोजी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
नूतन विद्यालयातील राजेंद्र गिल्डा सभागृहात हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी उद्योजिका नंदिनी नरेंद्र चपळगावकर (छत्रपती संभाजीनगर), प्रमुख पाहुण्या सेवानिवृत्त उपप्राचार्य स्नेहल पाठक (माजलगाव), महिला मंडळाच्या अध्यक्षा विजया कोठेकर, सचिव ललिता गिल्डा, वर्षा डोंग्रजकर, वरुणा चारठाणकर आदींची मंचावर उपस्थिती होती.
स्वातंत्र्य सैनिक गीताबाई चारठाणकर यांच्या स्मृती निरंतर जागृत राहाव्यात व त्यांच्या कार्याची प्रेरणा इतरांनी घ्यावी, या उद्देशाने मराठवाडा पातळीवर शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात बहुमोल कार्य करणाऱ्या एका भगिनीला दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते. पुरस्काराचे हे २९ वे वर्ष आहे. २०२३ या वर्षी अभिनेत्री चिन्मयी सुमित यांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी ‘महिलांची सुरक्षितता : काळाची गरज’ या विषयावर स्नेहल पाठक यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक ललिता गिल्डा यांनी केले, सूत्रसंचालन मीरा देशमुख, तर कांचन बाहेती यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी शैलजा अंबेकर, करुणा बागले-कुलकर्णी, शुभदा चारठाणकर, वरुणा कुलकर्णी-चारठाणकर, रोहिणी कुलकर्णी, रजनी सुभेदार, वसुधा खारकर, शैलजा अंबेकर , करुणा कुलकर्णी, सरिता उमरीकर, मधुरा खारकर, सुरेखा वांबुरकर, अनुपमा देवधर, भाग्यश्री धामणगावकर आदींसह महिला मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. डॉ.राजाभाऊ चारठाणकर, वामनराव वाईकर, बाबासाहेब चारठाणकर आदींसह सेलूतील महिला, मान्यवर, नागरिकांची उपस्थिती होती.
फोटो ओळी : सेलू (जि.परभणी) येथील महिला मंडळाच्या वतीने जेष्ठ सिने नाट्य अभिनेत्री चिन्मयी सुमित यांना वीर महिला गीताबाई चारठाणकर पुरस्कार शुक्रवारी प्रदान करण्यात आला. नंदिनी चपळगावकर, स्नेहल पाठक, विजया कोठेकर, सचिव ललिता गिल्डा आदींची उपस्थिती होती. ( छयाचित्र : सदाशिव महाजन)