Tennis Volleyball : डॉ.व्यंकटेश वांगवाड यांनी जगाला टेनिसव्हॉलीबॉल खेळ दिला; अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम
विविध कार्यक्रमांनी जागतिक टेनिसव्हॉलीबॉल दिन उत्साहात
पुणे : टेनिसव्हॉलीबॉल खेळाचे जनक डॉ.व्यंकटेश वांगवाड यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तसेच जागतिक टेनिसव्हॉलीबॉल दिनानिमित्त देशाच्या विविध भागात १६ जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात आणि भारताच्या विविध राज्यात स्पर्धा, चर्चासत्र, कार्यशाळा, वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांनी जागतिक टेनिसव्हॉलीबॉल दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
पुणे येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे महविद्यालयात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून अहमदपूरचे माजी आमदार बबरुवाहन खंदाडे, संस्थेचे सचिव रोहन दामले, प्राचार्या डॉ.कमल वाघचौरे, टेनिसव्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आनंद खरे, माजी प्राचार्य डॉ.कुकाले, मिलिंद जावडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी डॉ.वांगवाड यांना टेनिसव्हॉलीबॉल खेळातील अनमोल योगदानाबद्दल गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ.वांगवाड यांनी टेनिसव्हॉलीबॉलच्या आजवरच्या प्रवासाबद्दल माहिती दिली.
आनंद खरे यांनी सांगितले की, डॉ.वांगवाड यांनी टेनिसव्हॉलीबॉल हा नवा खेळ जगाला दिला आहे. यामध्ये त्यांचे आपार कष्ट आहेत. त्यांच्यामुळेच आज टेनिसव्हॉलीबॉलने या रौप्यमहोत्सवी वर्षापर्यंत मजल मारली आहे. माजी आमदार बबरुवाहन खंदाडे यांनी, टेनिसव्हॉलीबॉलचा सुवर्ण महोत्सव आणि डॉ. वांगवाड यांचा शंभरावा वाढदिवस साजरा करायचा आहे. त्यासाठी ईश्वर डॉ.वांगवाड यांना शतायुष्य देणार आहे, अशी प्रार्थना करीत शुभेच्छा दिल्या. यावेळी दैनिक महाराष्ट्र स्पोर्ट्सच्या वतीने जागतिक टेनिसव्हॉलीबॉल दिन व डॉ.वांगवाड यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित विशेषांकाचे विमोचन करण्यात आले. संपादक सुधीर भालेराव व राज्य सचिव गणेश माळवे यांनी विशेषांकासाठी पुढाकार घेतला. नाशिकमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी डॉ.रितेश वांगवाड, अजितकुमार फरांदे, प्रफुल्लकुमार बन्सोडे, संदिप भोसले, सौरभ माळवे, संजय पावडे यांच्यासह खेळाडू, क्रीडा संघटक, शिक्षक, संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Helping Hands : ‘हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्याचे वाटप