इर्शाळवाडी : दरडग्रस्तांसाठी डासाळा शाळेतील विद्यार्थ्यांची मदत; खाऊचे तीन हजार रुपये जमविले
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत पाठविणार
सेलू जि.परभणी : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दरडग्रस्तांसाठी सेलू (जि.परभणी) तालुक्यातील डासाळा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी मदत निधीच्या माध्यमातून तीन हजार ३९ रुपये जमा केले आहेत.
इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळून जीवित व वित्तहानी झाली. या दुर्घटनेत कित्येक कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. बऱ्याच लोकांना अन्न ,वस्त्र, निवारा राहिला नाही. अशांना मदत करण्यासाठी डासाळा शाळेचे मुख्याध्यापक मधुकर काष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली मदत निधी जमा करण्यात आला. यामध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या खाऊचे पैसे दरडग्रस्तांना मदत म्हणून आनंदाने दिले. तसेच ग्रामस्थ व शिक्षकांनीदेखील यामध्ये आर्थिक योगदान दिले. तीन हजार ३९ रुपयांचा मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून पाठवण्यात येणार आहे, असे मुख्याध्यापक मधुकर काष्टे यांनी सांगितले.