Dr.Suraj Yengde : बहुजनांनी सत्ताधारी बनण्यासाठी प्रयत्न करावेत : डॉ.सूरज एंगडे
परभणीमध्ये आंतरराष्ट्रीय विचार उत्सव २०२३ : शांतारामबापू पंदेरे यांना सम्यक जीवन गौरव पुरस्कार प्रदान
परभणी : नवीन दलित-आंबेडकरी आंदोलने झाली ती मनुवादी पक्षांनी हस्तगत केली असून न विकला जाणारा समाज तयार होण्याची गरज आहे. त्यामुळे समाजाच्या नैतिकतेत बदल घडविण्यासाठी बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता असल्याचे सांगत, सबंध बहुजनांनी सत्ताधारी बनण्यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन हॉवर्ड व ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय स्कॉलर तथा विश्वविक्रमी ‘कास्ट मॅटर्स’ ग्रंथाचे लेखक डॉ. सूरज एंगडे यांनी केले.
परभणी येथे सर्वधर्मीय फुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सव समिती महावंदना, श्री शिवाजी महाविद्यालयाची सह्याद्री माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.23) आंतरराष्ट्रीय विचार उत्सव 2023चे आयोजन करण्यात आले होते. ‘स्मृतिशेष बुध्दप्रिय कबीर नगरी’ असे नाव दिलेल्या श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात ‘वर्तमान लोकशाही पुढील आव्हाने आणि मानवतावादी संवाद’ या विषयावर डॉ.एंगडे बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आबेडकरी विचारवंत शांताराम बापू पंदेरे हे होते. याप्रसंगी प्रख्यात संशोधक प्रा. डॉ. देवेंद्र इंगळे यांचेही व्याख्यान झाले.
डॉ.एंगडे यांनी सांगितले की, प्रत्येक स्तरावर समाजातून नवे नेतृत्व निर्माण होण्यासाठी सजग राहणे गरजेचे आहे. कुणी हिंमत करून पुढे येवून नवीन काही मांडू पाहत असेल तर प्रोत्साहन देवून त्याचे मनोबल वाढवले पाहिजे. काहीही नवीन करायचे म्हटले तर करू नको म्हणणार्यांचा वर्ग बहुसंख्य असतो. तुझ्याकडून होणार नाही, असे बरेचजण सांगून त्याला मागे खेचतात. त्यामुळे काय होतं तुम्हाला स्वतःचं पुढे जावं लागतं,असंही परखड मत एंगडे यांनी व्यक्त केले. देशातील राजकीय पक्षांमध्ये उच्चवर्णीयांच्या हातात राजकीय पक्षांचे नेतृत्व कसं सामावलं गेलं आहे याबाबत त्यांनी भाष्य केले. एवढंच नाही तर आपल्या समाजात कुठलाही नेता तयार झाला की, त्याला पदाच्या राजकारणापुरतेच मर्यादित ठेवले जाते. राजकारण व्यापक व्हायला हवे असेही मत त्यांनी व्यक्त केले.
उजव्या विचाराचे लोक प्रक्षोभक वक्तव्ये करून दलितांना डिवचतात, कुणीतरी इतरांना घेवून रस्त्यावर उतरतो आणि त्याचा निषेध करतो, नंतर समोरच्याने माफी मागितली की प्रकरण मिटवले जाते. ही मंडळी आपल्याला कायम प्रतिक्रियावादी आणि आंदोलनकारी बनवते, तुम्ही आंदोलने करा आम्ही सत्तेत राहू, असे ते म्हणतात. आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो. देशामध्ये काही विशिष्ट जातींकडेच अर्थव्यवस्था केंद्रित झाली आहे. यातील बहुतांश जाती सवर्णांतील आहेत, हे लक्षात घ्यायला हवे.
आपण मूलभुत हक्कांसाठी लढायचे, त्यांनी एक-दोन मागण्या मान्य करून आंदोलन मिटवायचे. अशा पध्दतीने समाज भरकटत आहे. त्यातून निराशा, न्यूनगंड येत असल्याचे निरीक्षण श्री.एंगडे यांनी नोंदवले. प्रबोधन चळवळीत सर्वांनीच आपले योगदान दिले पाहिजे, आपल्या आचरणाची श्रीमंती दाखवली पाहिजे. गरिबांना शिक्षणाचे महत्व पटवून द्या. नवे विचार मांडले पाहिजेत. मनुवादी व्यवस्था हीच आपल्यासमोरील एकमेव अडचण आहे का? त्यासोबत सामंतिय व्यवस्था, भांडवली व्यवस्था, स्त्री-पुरूष भेद व्यवस्थादेखील आहेत. आपण व्यवस्थेचे बळी ठरत आहोत.
उत्तरप्रदेशात बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून मायावतींनी दोन वेळा सत्ता संपादन केली. त्यांनी दलित समाजासाठी केलेल्या महत्वपूर्ण कार्याचा उल्लेख करीत सत्तेमध्ये गेल्याने कसे फायदे होतात ते सांगितले. तसेच एखाद्याने नवा विचार मांडला की लगेच त्याचा झेंडा हाती घेवू नका, स्थानिक राजकारणात कोणतेही नेतृत्व जातीनिहाय ठरवू नका. तुमच्या आशा-आकांक्षा पुढे नेणारे नेतृत्व असले पाहिजे.
आपल्या पोटापाण्याच्या प्रश्नांवर, बजेटवर बोलणारे आर्थिक नागरिक तयार झाले पाहिजेत. ढासळलेली गुणवत्ता आणि सरकारी अनास्था यामुळे शिकवणी संस्थांच्या माध्यमातून शाळांऐवजी पर्यायी नवी भांडवली शिक्षण व्यवस्था निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले. निवृत्त लोकांनी तरूणांना आपले अनुभव सांगावेत. तरूणांनी पुस्तके वाचावीत, ज्ञानी बनावे, परिवर्तन होईल, क्रांती घडेल. सांस्कृतिक बदलात सर्वांनी योगदान द्यावे. विद्यार्थ्यांनी विवेकी विचारांची सोबत ठेवावी. जाती-धर्माच्या चक्रव्यूहात न अडकता स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे, असा कानमंत्र युवकांनी नवीन विचार घेवून पुढे जावे. वाचन संस्कृती जिवंत ठेवावी, असे आवाहन श्री.एंगडे यांनी यावेळी केले. प्रारंभी ज्येष्ठ आबेडकरी विचारवंत शांताराम बापू पंदेरे यांना मान्यवरांच्या हस्ते यावर्षीचा ‘सम्यक जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रास्ताविक प्रा.डॉ.सुरेश शेळके यांनी केले. सुत्रसंचालन यशवंद मकरंद यांनी केले.
मणिपुरातील घटना माणुसकीला काळीमा फासणारी
मणिपूर राज्यातील हिंसाचारादरम्यान दोन महिलांची नग्न धिंड काढल्याचा व्हिडिओ पाहून सुन्नच झालो. काय प्रतिक्रिया द्यावी तेच कळेना. एवढा अमानुष प्रकार जवळपास ७९ दिवसानंतर आपल्याला कळाला. परभणी जिल्ह्यातील ब्राम्हणगाावातही अशाच प्रकारची घटना घडलेली आहे. फुलनदेवीसोबतही असेच कृत्य करण्यात आले. माता-भगिणींवरील अत्याचाराची खैरलांजीसारखी अनेक प्रकरणे घडली आहेत. मणिपुरातील महिलांची नग्न धिंड ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून निषेध करतो, असे डॉ.एंगडे म्हणाले. मणिपुरच्या घटनेनंतर महाराष्ट्रात संविधानाचे रक्षक म्हणवणारे फुले-शाहू-आंंबेडकरी विचारधारेचे लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर यायला हवे होते. पण तसे झाले नाही. इतरही कुठले संघटन रस्त्यावर आले नाही. विशिष्ट जातींसाठीच आपण बाहेर येतो की काय? असा सवाल करीत कुठल्याही अल्पसंख्यांक, मागासवर्गियावर अन्याय झालेला असेल तर आपण रस्त्यावर येवून आवाज उठवला पाहिजे, असे डॉ.सूरज एंगडे म्हणाले.