प्रोफेसर डॉ.व्ही.के.देशपांडे यांचे निधन; छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
सेलूच्या नूतन विद्यालयातील गणिताचे विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून सेवा ठरली संस्मरणीय
सेलू जि.परभणी : डॉ.बाबाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सेवानिवृत्त प्रोफेसर डॉ.व्ही.के.देशपांडे-सारणीकर (वय ८८, रा.नंदनवन कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) यांचे मंगळवारी, २५ जुलै रोजी निधन झाले. बुधवारी, २६ जुलै रोजी दुपारी एकच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर छावणी परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा मकरंद, सून, नातवंडे असा परिवार आहे. सेलू (जि.परभणी) येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डी.के.देशपांडे यांचे ते वडील बंधू होत.
प्रोफेसर डॉ.व्ही.के.देशपांडे मूळचे बीड जिल्ह्यातील सारणी येथील रहिवाशी. सारणी येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी ते अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेत दाखल झाले. याच संस्थेमध्ये १९५७ ते १९६१, तर पुढे १९६४ ते १९६६ या कालावधीत सेलू येथील नूतन विद्यालयात गणिताचे विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांनी बजावलेली सेवा संस्मरणीय ठरली. जालना येथील महाविद्यालयातही चार वर्षे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी अध्यापनाचे कार्य केले.
१९७० ते १९७८ या कालावधीत अमेरिकेतील विस्कॉन्सिन मिलवॉकी विद्यापीठात संशोधन कार्य करीत त्यांनी डॉक्टरेट संपादन केली व तेथेच काही काळ अध्यापनाचे कार्य केले. १९७८ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये गणिताचे प्रोफेसर व पुढे विभाग प्रमुख म्हणून त्यांचे कार्य उल्लेखनीय राहिले आहे. प्रोफेसर डॉ.व्ही.के.देशपांडे यांच्या निधनाबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्था व सेलूतील विविध स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे.
अमेरिकेतील विस्कॉन्सिन मिलवॉकी विद्यापीठात प्रोफेसर डॉ.व्ही.के.देशपांडे यांनी संशोधन कार्य करीत, डॉक्टरेट संपादन केली व तेथेच काही काळ अध्यापनाचे कार्य केले. १९७८ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये गणिताचे प्रोफेसर व पुढे गणित विषयाचे विभाग प्रमुख म्हणून त्यांचे कार्य उल्लेखनीय राहिले आहे.