आनंदसोहळा : प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांच्या ‘निमित्त’चा प्रकाशन सोहळा ठरला प्रेरणादायी

आनंदसोहळा : प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांच्या ‘निमित्त’चा प्रकाशन सोहळा ठरला प्रेरणादायी

सेलूतील नूतन विद्यालयात कार्यक्रम, मान्यवरांची उपस्थिती, आगळ्यावेगळ्या प्रकाशनाने वेधले लक्ष

सेलू जि.परभणी : मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मृती स्तंभाच्या प्रतिकृतीतून मान्यवरांनी अलगद पुस्तक उचलतांना, विद्यार्थ्यांनी गायिलेल्या ‘बलसागर भारत होवो…’ च्या स्फूर्तिदायी स्वरांनी, सेलू (जि.परभणी) येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे माजी चिटणीस प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांच्या ‘निमित्त’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा प्रेरणादायी ठरला.
सेलूतील नूतन विद्यालय शिक्षण संस्था आणि सन्मित्र प्रकाशन समितीच्या वतीने हा सोहळा आयोजिण्यात आला होता. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.प्रभाकर देव, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक तथा पत्रकार डॉ.आसाराम लोमटे, चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी डॉ.देव यांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या आठवणींना उजाळा देत, अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण व इतिहास सर्वांनी समजून घेणे आवश्यक आहे, असे सांगितले. प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांच्या ‘ निमित्त’ पुस्तकाने हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या लढ्याला उजाळा मिळाला आहे. मुक्ती संग्रामाच्या पंचाहत्तर वर्षांचा आलेखच या पुस्तकात मांडलेला आहे, असे देव म्हणाले.

या वेळी बोलतांना माजी विद्यार्थी तथा प्रसिद्ध साहित्यक, पत्रकार डॉ.आसाराम लोमटे म्हणाले की, वयाच्या नव्वदीतही वाचनाचा व्यासंग आणि लेखनाची तळमळ जोपासणारे प्राचार्य द.रा.कुलकर्णी म्हणजे मूर्तिमंत आदर्शाचे प्रतीक आहेत. अशी माणसे, समाज संपन्न, सदृढ व्हावा. कसोटीच्या क्षणी त्याच्यामध्ये सद्सद् विवेक जागवावा आणि आदर्श विचारांची पेरणी करीत टिकवावा, यासाठी सतत धडपडणारी असतात. हैदराबाद मुक्तीसंग्राम, समाजाची स्थिती आणि नूतन विद्यालय शिक्षण संस्था याचे प्रतिबिंब आणि अक्षरांची खरी तळमळ ‘निमित्त’ मध्ये उमटलेली आहे, असेही डॉ.आसाराम लोमटे म्हणाले. प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांच्यामध्ये विद्यार्थ्यांकडे पाहाण्याची अंतर्दृष्टी आहे. याद्वारे असंख्य विद्यार्थ्यांना त्यांनी ऊर्जा व बळ दिले, असे सांगून नूतन विद्यालय शिक्षण संस्थेशी असलेल्या भावनिक नात्यांच्या आठवणींना लोमटे यांनी आपल्या भाषणातून उजाळा दिला.

आनंदसोहळा : प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांच्या 'निमित्त'चा प्रकाशन सोहळा ठरला प्रेरणादायी

प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ.लोया यांनी अध्यक्षीय भाषण केले. याप्रसंगी कथाकथन स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. यानिमित्ताने विजया कोठेकर यांनी दुर्गाताई कुलकर्णी यांच्या आठवणी सांगितल्या. डॉ.अनघा वैद्य-देशपांडे यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. प्रारंभी स्वामी रामानंद तीर्थ, श्रीरामजी भांगडिया, दुर्गाताई कुलकर्णी यांच्या प्रतिमांचे पूजन झाले.‌ सान्वी देशपांडे हीने कथक नृत्यातून गणेश वंदना, तर सच्चिदानंद डाखोरे, पूजा महाजन, गिरीष दीक्षित व विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.कोठेकर, सूत्रसंचालन अशोक लिंबेकर, तर शुभदा वैद्य यांनी आभार मानले. माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, उद्योजक आर.बी.घोडके, माजी सभापती अशोक काकडे, गोविंदभाऊ जोशी, ॲड.श्रीकांत वाईकर, डॉ.सुनील कुलकर्णी, मिलिंद सावंत, डॉ.अरुण रोडगे, किशोर जोशी,  मयूर प्रिंटर्स, नांदेडचे सतीश कुलकर्णी, रवींद्र वैद्य, डॉ.राजेंद्र वैद्य, सुरेंद्र वैद्य, अजित मंडलिक आदींसह वैद्य परिवार, नूतन शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी व विविध क्षेत्रातील नागरिक, महिला उपस्थित होत्या. समारंभासाठी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेतील कर्मचारी व संयोजन समितीने पुढाकार घेतला.

कथाकथन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

स्व.दुर्गाताई कुलकर्णी यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त नूतन कन्या प्रशालेच्या वतीने कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मुख्याध्यापिका संगीता खराबे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका कीर्ती राऊत व संयोजन समितीच्या पुढाकाराने स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. नूतन विद्यालय शिक्षण संस्था अंतर्गत शाळा व संस्था व्यतिरिक्त शाळा अशा दोन स्तरांवर, इयत्ता चौथी ते सहावी व सातवी ते नववी या दोन गटांत ही स्पर्धा झाली. स्पर्धेतील विजेत्यांना रविवारी पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.‌
विजेत्यांची नावे अशी : इयत्ता चौथी ते सहावी ( संस्था अंतर्गत) : प्रथम – आर्या लक्ष्मीकांत कुलकर्णी, द्वितीय – अक्षरा गजानन पवार, इयत्ता सातवी ते नववी ( संस्था अंतर्गत)‌: प्रथम – समीक्षा दिनकर कुलकर्णी, व्दितीय – श्रीनिवास बालासाहेब देवकर, इयत्ता चौथी ते सहावी (संस्था व्यतिरिक्त) : प्रथम – आयुष गुलाबराब ताठे, इयत्ता सातवी ते नववी (संस्था व्यतिरिक्त) : प्रथम : क्षितिजा कैलास खजिने, द्वितीय – दुर्गा नामदेव मगर

आनंददायी प्रकाशन सोहळ्याने वेधले लक्ष

प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांच्या ‘निमित्त’ पुस्तकाच्या प्रकाशन  हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये होत असल्याने प्रकाशन सोहळ्यामध्ये मुक्तिसंग्रामाचे स्फूर्तित्व उपस्थितांनी अनुभवले. संयोजन समितीच्या कल्पकतेला सेलूतील कलाप्रेमी रसिक कलाकार दीपक देवा यांनी आकार दिला. प्लायवूडपासून हैदराबाद मुक्तीसंग्राम स्मृती स्तंभाची प्रतिकृती साकारली. कलाशिक्षक गजानन मजगे यांनी त्यावर कलेचा साज चढविला. या स्मृती स्तंभाची इवलशी दारे हलकेच उघडून, मान्यवरांनी अलगद ‘निमित्त’ पुस्तक प्रकाशिततांना, विद्यार्थ्यांनी गायिलेल्या ‘बलसागर भारत होवो…’ या स्फूर्तिदायी स्वरांच्या गजरात ‘निमित्त’चे प्रकाशन झाले. या आनंददायी प्रसंगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शिक्षक भालचंद्र गांजापूरकर यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला.

वयाच्या नव्वदीतही वाचनाचा व्यासंग आणि लेखनाची तळमळ जोपासणारे प्राचार्य द.रा.कुलकर्णी म्हणजे मूर्तिमंत आदर्शाचे प्रतीक आहेत. अशी माणसे, समाज संपन्न, सदृढ व्हावा. कसोटीच्या क्षणी त्याच्यामध्ये सद्सद् विवेक जागवावा आणि  आदर्श विचारांची पेरणी करीत टिकवावा. यासाठी धडपडणारी असतात, असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध साहित्यक, पत्रकार डॉ.आसाराम लोमटे यांनी याप्रसंगी नमूद केले. हैदराबाद मुक्तीसंग्राम, समाजाची स्थिती आणि नूतन विद्यालय शिक्षण संस्था याचे प्रतिबिंब आणि अक्षरांची खरी तळमळ ‘निमित्त’ मध्ये उमटलेली आहे, असेही डॉ.लोमटे म्हणाले. प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांच्यामध्ये विद्यार्थ्यांकडे पाहाण्याची अंतर्दृष्टी आहे. याद्वारे असंख्य विद्यार्थ्यांना त्यांनी ऊर्जा व बळ दिले, असे सांगून नूतन विद्यालय शिक्षण संस्थेशी असलेल्या भावनिक नात्यांच्या आठवणींना लोमटे यांनी आपल्या भाषणातून उजाळा दिला.

आनंदसोहळा : प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांच्या 'निमित्त'चा प्रकाशन सोहळा ठरला प्रेरणादायी


Amitabh-Somnath : कष्टापुढे ठेवियेला माथा : फौजदारकी जिंकून वेठबिगार आईचे फेडले पांग ; देऊळगाव गातच्या सोमनाथची ‘एमपीएससी’त भरारी

Dhananjay Munde : कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या बैठकीनंतर संयुक्त किसान मोर्चाचे आंदोलन मागे

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!