Amitabh-Somnath : कष्टापुढे ठेवियेला माथा : फौजदारकी जिंकून वेठबिगार आईचे फेडले पांग
देऊळगावगातच्या सोमनाथची ‘एमपीएससी’ परीक्षेमध्ये भरारी
Authored By Babasaheb Helaskar
सेलू जि.परभणी : घरात अठरा विश्वे दारिद्र्य, वेठबिगार आई वडील, त्यात बालपणीच वडिलांचे छत्र हरपले. आईने पडेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला. मुलामध्ये कष्टाची पणती तेवत ठेवली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत, मुलाने पदवीचे शिक्षण पूर्ण केले. अर्धवेळ नोकरी करून कुटुंबाला हातभार लावला. जिद्दीने एमपीएससी परीक्षेची तयारी केली. पाच वर्षापूर्वी बीग बी अमिताभपासून मिळविलेला आत्मविश्वास जपून ठेेवत, चिकाटीने १९ जुलै रोजी पहिल्याच प्रयत्नात फौजदारकी जिंकली. आणि वेठबिगार आई आणि कुटुंबीयांचे पांग फेडले. मूळच्या सेलू ( जि.परभणी) तालुक्यातील देऊळगाव गातच्या सोमनाथ दशरथ तांबेची ही गाथा, कष्टापुढे माथा ठेवियेला पाहिजे, हेच सांगून जाते.
जिद्द, मेहनत, चिकाटीच्या जोरावर परिस्थितीवर मात करून यश संपादन करता येते, असा आदर्शच जणू २३ वर्षीय सोमनाथने घालून दिला आहे. मूळचे देऊळगाव गात येथील दशरथ तांबे व त्यांच्या पत्नी गंगुबाई पोटाची खळगी भरण्यासाठी १९८२ मध्ये नवी मुंबईतील वाशी परिसरात स्थायिक झाले. पत्नी, सहा मुली व त्यापाठी एक मुलगा सोमनाथ. असे दशरथ तांबे यांचे कुटुंब आहे. वाशी नाक्यावर वेठबिगार कामगार म्हणून कष्ट उपसत, दशरथ यांनी कुटुंबाचा चरितार्थ चालविला. चार मुलींचे लग्न करून दिले. आणि कर्करोगाने पछाडलेल्या दशरथ यांचे २००८ मध्ये अकाली निधन झाले. दोन मुली व सोमनाथच्या शिक्षणासह कुटुंबाची जबाबदारी गंगुबाई याच्यावर आली. इतरांकडे धुणी, भांडी व पडेल ते काम करून गंगुबाई यांनी कुटुंबाचा व्यवस्थित सांभाळ केला. सोमनाथ लहानपणापासून हुशार व तल्लख बुद्धीचा. त्याने प्राथमिक, उच्च माध्यमिक शिक्षण महापालिकेच्या शाळेतून पूर्ण केले. मुंबई येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातून त्याने बीकाॅमची पदवी संपादन केली. दरम्यान, घरची गरीबी असल्याने शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय आपल्याकडे नाही. एमपीएसीत परीक्षेतून चांगली व सुरक्षित नोकरी व चांगला पगार मिळतो, अशी माहिती सोमनाथला लोकांकडून मिळत होती. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत एमपीएसी परीक्षा उत्तीर्ण करायचीच हेच धेय्य ठेवून तो तयारीला लागला. अनेक अडचणी होत्या. पंरतु, चुलत भाऊ तुकाराम तांबे यांनीही वेळोवेळी मार्गदर्शन करून शिक्षणाची प्रेरणा दिल्याचे सोमनाथने सांगितले. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने खाजगी क्लासशिवाय महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या परीक्षेच्या तयारीला तो झपाटून लागला. नवी मुंबई महापालिकेच्या मोफत अभ्यासिकेचा उपयोग करत युट्युब वरील मार्गदर्शनाचा त्याने योग्य पद्धतीने उपयोग करून घेतला. तेरा-तेरा तास स्व-अभ्यास करून एमपीएसी परीक्षेची तयारी केली. याच दरम्यान दुपारी तीन ते रात्री अकरा या वेळेत खाजगी नोकरी करून स्वतःचा खर्च भागवत, कुटुंबालाही आर्थिक आधार दिला. कष्ट, मेहनत व जिद्दीच्या जोरावर सोमनाथने पोलीस उपनिरीक्षक पदासाठी झालेल्या एमपीएसी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. आठ हजार लोकवस्तीच्या देऊळगाव गात मधून एमपीएससी उत्तीर्ण करणारा सोमनाथ पहिला ठरला आहे. सोमनाथच्या यशाचे गावकऱ्यांसह सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
दोन नोव्हेंबर २०१७ रोजी बिग बी आमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेंगा करडोपती’ च्या हाॅट सीटवर बसण्याचा बहुमान सोमनाथने मिळविला. या शो मध्ये नऊ फेर्या पूर्ण करून सोमनाथने आपल्या बुध्दीमतेची झलक दाखविली होती. रोख एक लाख साठ हजार रूपये तो जिंकला होता. परंतु महानायक आमिताभ बच्चन यांच्या सोबत काही काळ घालविण्याचे भाग्य सोमनाथला लाभले. याच मंचावर कमावलेल्या आत्मविश्वासाचाही फौजदारकीच्या परीक्षेतील यशात निश्चितच वाटा असल्याचे समाधान सोमनाथच्या चेहऱ्यावर खुलून दिसते.