युट्युब व्हिडिओ : राज्यस्तरीय वक्तृत्वस्पर्धेत अनुष्का हिवाळे सर्वप्रथम; मुंबईत झाला गौरव
परभणी : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती आयोजित राज्यस्तरीय ‘ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जीवन आणि कार्य ‘ या विषयावर युट्युब व्हिडिओ वक्तृत्व सादरीकरण स्पर्धेत परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या अनुष्का सुरेश हिवाळे या विद्यार्थिनींने प्रथम क्रमांक पटकावला.
मुंबई तरुण भारत आणि मुंबई विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत महाराष्ट्रातील ३८ स्पर्धक सहभागी झाले होते. कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा आणि साहित्य भवन मुंबई विद्यापीठात सोमवारी, ३१ जुलै रोजी कार्यक्रमाचे अध्यक्ष गृहमंत्रालयाचे सहसचिव सिध्दार्थ खरात, प्रमुख पाहुणे लोककला अकादमी, मुंबई येथील सहायक प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, संयोजक मुंबई विद्यापीठातील इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. शिवाजी सरगर, तरूण भारत मुंबईचे संपादक किरण शेलार, उपसंपादक योगिता साळवी या मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, दहा हजार रुपये पुरस्कार देऊन अनुष्काचा सत्कार करण्यात आला. अनुष्काच्या यशा बद्दल प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, श्री शिवाजी महाविद्यालय, परभणीचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ. रोहीदास नितोंडे, प्रा. प्रल्हाद भोपे, प्रा.जयंत बोबडे यांनी अभिनंदन केले आहे.