Amrit Bharat Station Scheme : सेलू स्थानकाच्या २३ कोटींच्या पुनर्विकासकामांचा रविवारी शुभारंभ; पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद
आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती, उपस्थित राहण्याचे आवाहन
परभणी : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने स्थानकांचा विकासासाठीच्या ‘अमृत भारत रेल्वे स्थानक’ पुनर्विकास योजनेअंतर्गत देशभरातील ५०८ स्थानकांच्या पुनर्विकासकामांचा शुभारंभ रविवारी, ६ ऑगस्ट रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सेलू (जि.परभणी) रेल्वे स्थानकांवर २३.२ कोटी रुपयांची पुनर्विकासकामांचा शुभारंभ रविवारी सकाळी नऊ वाजता होत आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन जिंतूर-सेलूच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील परभणी, सेलू, पूर्णा व गंगाखेड स्थानकांचा समावेश आहे. चारही स्थानकावर व्हिडिओ कॉन्फरन्स समारंभाची जय्यत तयारी सुरू आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे, दर्शवना जरदोश आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या योजनेअंतर्गत स्थानकांचा दीर्घकालीन दृष्टिकोनातून विकास करण्यावर भर दिला जाणार आहे. दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या लक्षात घेऊन विकासाचे नियोजन, स्थानकाची सध्याची रचनाही विचारात घेऊन प्रामुख्याने प्रवासीकेंद्रित सोयीसुविधा स्थानकांवर विकसित केल्या जाणार आहेत. स्थानकाच्या बाह्य तसेच अंतर्गत भागात आवश्यक सुधारणा, स्वच्छतागृह, परिसरातील वाहतूक सुधारणा, परिसराचे सुशोभीकरण, प्रवेशद्वारांचा विकास, प्रतीक्षागृह, स्वयंचलित जिन्यांची उभारणी, मोफत वायफाय आदी आवश्यक सोयीसुविधांचा योजनेअंतर्गत समावेश आहे. यामुळे स्थानकांच्या चेहरामोहरा बदलणार आहे.
सेलू (जि.परभणी) रेल्वे स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार आहे. सेलू स्थानकावर २३.२ कोटी रुपयांच्या पुनर्विकासकामांचा शुभारंभ कार्यक्रम रविवारी सकाळी नऊ वाजता होत आहे. नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले आहे.