CM Eknath Shinde : आता १५ ऑगस्टनंतरच मुख्यमंत्री परभणीमध्ये ? दौरा पुढे ढकलला
परभणी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी, १२ ऑगस्ट रोजी परभणी येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत जिल्हास्तरीय विशेष कार्यक्रम दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी मंगळवारी (८ ऑगस्ट ) दुपारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आता १५ ऑगस्टनंतरच मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौर्याची तारीख कळेल, असे गावडे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व मंत्रीगण कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. दरम्यान, कार्यक्रमासाठी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ क्रीडा संकुलाच्या मैदानावर मंडप उभारणीची तयारी सुरू आहे. याशिवाय आवश्यक ती सर्व पूर्वतयारी जिल्हा प्रशासन व संबंधित विभागांकडून केली जात आहे. तीन हेलिपॅड तयार केले जात आहेत. मात्र, दौरा पुढे ढकलला गेला असल्याने पुढील तारखेची उत्सुकता आहे.