जिंतूर-सेलूतील सिंचनाचा अनुशेष दूर होणार : आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर
परभणी : पूर्णा सिंचन प्रकल्पाच्या येलदरी धरणातून तसेच दुधना, कसुरा नदीवरील प्रस्तावित साखळी बंधाऱ्यामुळे जिंतूर तालुक्यातील १५, तर सेलूतील १४ अशा वाढीव २९ गावांच्या शेतशिवारात आता पाणी खेळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या गेल्या अनेक वर्षांपासूनचा सिंचनाचा अनुशेष दूर होण्यास मदत मिळणार आहे.
यासंदर्भाने जलसंपदा विभागातील कामांची आढावा बैठक सात ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. तीत हा निर्णय झाला असून या बाबत तत्वतःमान्यतेचे प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात येणार आहेत, अशी माहिती आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली आहे.
आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या वेळी गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमणवार, मुख्य अभियंता जयंत गवळी, सुनील भोम्बे पाटील, कार्यकारी अभियंता बिराजदार, लांब, कोरके, कविराज कुचे,शिंदे आदी सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पूर्णा नदीवरील येलदरी धरणातील पाण्याचे नियोजन व सिंचनक्षेत्र याचे नियोजन यापूर्वीच पूर्ण झालेले असल्याने यामध्ये नवीन क्षेत्रामध्ये वाढ करणे शक्य नव्हते. परंतु, सिंचनक्षेत्राचे शहरीकरण झाले असल्याने या ठिकाणी जुन्याच मंजूर पाणी नियोजनामध्ये येलदरी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या गावांना सिंचनाची सोय व्हावी या दृष्टीने आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे सावंगी म्हाळसा, हिवरखेडा, जोगी तांडा, सावळी, घडोळी, घेवडा, मांडवा, इटोली, चारठाणा, भोसी, शेवडी, वाघी धानोरा, आडगाव बाजार आणि वसा ही गावे समाविष्ट करून प्रस्ताव सरकारकडे सादर करण्याबाबत बैठकीत निर्णय झाला आहे. यामुळे मागील ३० वर्षापासून सिंचनापासून वंचित १५ गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. तसेच जिंतूर आणि सेलू तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्प इतर मध्यम प्रकल्प, लघु पाटबंधारे या प्रकल्पाच्या, कालव्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव देखील शासनाकडे सादर करण्याबाबत निर्णय झालेला आहे. दुधना व कसुरा नदीवर साखळी पद्धतीचे बंधार्यांचे सर्वेक्षण करण्याचे काम पूर्ण करून सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय देखील या बैठकीमध्ये झाला आहे . त्यामुळे मागील कित्येक वर्षापासून सेलू तालुक्यातील शिंदे टाकळी, मालेटाकळी, सिद्धनाथ बोरगाव, आहेर बोरगाव, गोहेगाव, म्हाळसापुर, रवळगाव, डासाळा, देऊळगाव गात, गुगळी धामणगाव, खवणे पिंपरी, लाडनांद्रा, कुंडी, हिसी, राधे धामणगाव आदी गावांना सिंचनाची सोय उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच दुधना प्रकल्पाच्या शिल्लक राहिलेल्या उर्वरित कामाबाबत सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी तात्काळ मंजुरी घेण्याबाबतसुद्धा निर्णय झाला आहे, असे बोर्डीकर यांनी नमूद केले.
सेलू तालुक्यातील शिंदे टाकळी, मालेटाकळी, सिद्धनाथ बोरगाव, आहेर बोरगाव, गोहेगाव, म्हाळसापुर, रवळगाव, डासाळा, देऊळगाव गात, गुगळी धामणगाव, खवणे पिंपरी, लाडनांद्रा, कुंडी, हिसी, राधे धामणगाव आदी गावांना सिंचनाची सोय उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच दुधना प्रकल्पाच्या शिल्लक राहिलेल्या उर्वरित कामाबाबत सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी तात्काळ मंजुरी घेण्याबाबतसुद्धा निर्णय झाला आहे, असे बोर्डीकर यांनी नमूद केले.