पगार राष्ट्रीयकृत बॅंकेतूनच करा : परभणी जिल्ह्यातील खासगी शाळांतील शिक्षकांची मागणी
मराठवाडा शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली वेतन अधीक्षक भातलवंडे यांना निवेदन
परभणी : सर्व अनुदानित व अंशतः अनुदानित खासगी शाळांचे मासिक वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून करावे, असे स्पष्ट आदेश राज्य सरकारने निर्गमित केलेले आहेत. त्याची अंमलबजावणी राज्यभर सुरू आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील खासगी शाळांतील शिक्षकांचे वेतनही राष्ट्रीयकृत बँकांमधूनच करावेत, अशी मागणी जिल्ह्यातील शिक्षकांनी केली आहे.
या संदर्भात मराठवाडा शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली बुधवारी, ९ ऑगस्ट रोजी वेतन अधीक्षक मनोज भातलवंडे यांची भेट घेऊन दुसरे स्मरण निवेदन सादर केले आहे. शिक्षण उपसंचालक व माध्यमिक शिक्षणाधिकारी परभणी यांनी संदर्भीय आदेशाचे पालन करुन अंशत:अनुदानित तसेच सर्व अनुदानित खासगी शाळांचे वेतन, भत्ते खाते राष्ट्रीयकृत बँके मार्फत होण्यासाठी कार्यवाही बाबत कळविले आहे.
यापूर्वी ही २४ जुलै रोजी संघटनेच्या वतीने मागणीबाबत स्मरणपत्र दिले होते. तेव्हा सात ऑगस्टपर्यंत सकारात्मक निर्णय घेण्याचे वचन वेतन अधीक्षकांनी दिले होते. परंतु, त्यावर अद्याप कुठलाही निर्णय दिलेला नाही. सदरील प्रश्न हा जिल्ह्यातील हजारो खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील कर्मचाऱ्यांचा असून या प्रश्नी विशेष लक्ष घालून आपल्या स्तरावरून तात्काळ आदेशीत करावे, असे निवेदनात म्हटले आहे. या मागणीबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य बी.टी.सांगळे, विक्रम कदम, जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद, सचिव एन.टी.कदम, सहसचिव निशांत हाके, तालुकाध्यक्ष डी.के.देवकते आदींसह शिक्षकांच्या सह्या आहेत. दरम्यान, सेलू येथील नूतन विद्यालयातील शिक्षकांनाही राष्ट्रीयकृत बँकांमधून वेतन करण्यासाठी बुधवारी वेतन अधीक्षक भातलवंडे यांच्याकडे रितसर प्रस्ताव सादर केला आहे. या वेळी पी.टी.कपाटे, बाबासाहेब हेलसकर, संतोष मलसटवाड, सुरेश हिवाळे, अनंतकुमार विश्वांभर, संतोष क्षीरसागर, विजेंद्र धापसे, अरविंद अंबेकर, व्ही.एच.तोरणाळे, काशीनाथ पल्लेवाड, फुलसिंग गावीत आदींसह शिक्षक उपस्थित होते.
सरकारच्या निर्णयाप्रमाणे राष्ट्रीयकृत बॅंकेतून वेतन व्हावे, अशी परभणी जिल्ह्यातील खासगी शाळांतील सर्व शिक्षकांची सामुहिक भावना आहे. वेतन अधीक्षकांनी सकारात्मक निर्णयाचे आश्वासन दिले आहे. याच मागणीसाठी पंधरा ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहोत. त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. – यशवंत मकरंद, जिल्हाध्यक्ष, मराठवाडा शिक्षक संघ, परभणी