शुभेच्छांचा वर्षाव : माजी आमदार लहानेंना लवकरच मोठी संधी ? वाढदिवशी सेलूत काय म्हणाले काका…
वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतील चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
सेलू जि.परभणी : पाथरी विधानसभा मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक साधणारे, शिवसेनेचे माजी आमदार हरिभाऊकाका लहाने यांच्यावर ६५ व्या वाढदिवसानिमित्त शनिवारी, १२ ऑगस्ट रोजी चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
सकाळपासूनच लहाने यांच्या निवासस्थानी त्यांच्या चाहत्यांनी, बर्याच कालखंडानंतर नव्या उत्साहाने आपल्या आवडत्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, पवन आडळकर यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, राजकारण अशा विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक, विविध पक्ष, संघटनेतील नेते, कार्यकर्त्यांनी शुभेच्छांच्या माध्यमातून लहाने यांच्यावर भरभरून प्रेम व्यक्त केले.
लहाने व त्यांच्या कुटुंबीयांनी आलेल्या प्रत्येकाचे स्वागत केले. काकांनी शुभेच्छांचा प्रसन्नतेने स्वीकार केला. प्रत्येकाशी मनमोकळा संवाद साधला. जुन्या आठवणींना उजाळा देत, नवा आत्मविश्वास दिला. शिवसेनेच्या पहिल्या फळीपासूनच्या कट्टर शिवसैनिक, कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा जणू स्नेहमेळा भरलेला दिसला. यामध्ये ग्रामपंचायत सदस्यांपासून ते सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या आजी- माजी पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. या वेळी सहज संवाद साधताना माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी मनातल्या दाट भावनांना वाट मोकळी करून दिली.
श्री केशवराज बाबासाहेब मंदिरामध्ये अभीष्टचिंतन
माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त श्री केशवराज बाबासाहेब संस्थान व बंडू देवधर मित्र मंडळ यांच्या वतीने सत्कार आयोजिण्यात आला होता. या वेळी हरिभाऊ लहाने यांचे फेटा बांधून तसेच शाल, श्रीफळ, पुष्पहार व केशवराज बाबासाहेब महाराजांची प्रतिमा देऊन अभीष्टचिंतन करण्यात आले. प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, डॉ.सुनील कुलकर्णी, संतोष कुलकर्णी, बंडू देवधर व संस्थानचे पुजारी सुधीर मंडलिक आदींची उपस्थिती होती. डॉ.शरद कुलकर्णी व जेष्ठ पत्रकार डी.व्ही. मुळे यांनी मनोगतात लहाने यांनी केलेल्या विकासात्मक कार्याची माहिती दिली. लहाने यांच्या प्रयत्नांमुळे मंदिरसाठी मोठा विकास निधी उपलब्ध होत असून, एक चांगले देवकार्य होत आहे. त्यामुळे भविष्यात निश्चित त्यांना परमेश्वराची साथ मिळेल, असे नमूद करून शुभेच्छा दिल्या. या वेळी कृष्णा काटे व श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने लहाने यांची गुळतुला करण्यात आली. तुलेचा गूळ दादूपंथी गोशाळेला देण्यात आला.सुधीर मंडलिक व विश्वाभंर दीक्षित यांनी शांती पाठ पठण केले.
काम करण्याची नवी उभारी मिळाली
सत्काराला उत्तर देताना माजी आमदार हरिभाऊ लहाने म्हणाले, की आतापर्यंत आपण दिलेला शब्द पाळण्याचाच प्रयत्न केलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब संस्थानसाठी दोन कोटी, लोकमान्य टिळकांच्या पुतळा सुशोभीकरणासाठी ३० लाख तसेच येथील जागृत खंडोबा देवस्थानसाठी ५० लाख रूपये तसेच; शेरे गल्लीतील श्री जगदंबा मंदिरासाठी निधी उपलब्ध करून घेतला आहे. पुढे ते म्हणाले की, या सत्कार सोहळ्याने मी अत्यंत भारावून गेलो आहे. जबाबदारी अजून वाढली आहे. भविष्यात काम करण्याची उभारी मिळाली आहे. आमदारकीच्या काळात राहिलेली अपूर्ण कामे व मागील काळात जनतेला दिलेल्या शब्दांची पूर्तता करण्यासाठी भविष्यात प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाही लहाने यांनी या वेळी दिली.
दरम्यान, शिवसेनेतील उठावानंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय लहाने यांनी सुरुवातीपासून घेतला. लहाने यांच्या आमदारकीच्या काळातील अनेक नेते शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. एक जुना-जाणता शिलेदार म्हणून लहाने यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी परभणी लोकसभा मतदारसंघाच्या समन्वयक पदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. या माध्यमातूनच सेलू शहरासह ग्रामीण भागात विविध कामांसाठी मोठा विकास निधी खेचून आणण्यासाठी लहाने हे गेल्या काही दिवसांपासून यशस्वीरित्या प्रयत्न करत आहेत. यातूनच सेलू शहरातील विकासाच्या प्रलंबित कामांचा मार्ग मोकळा होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही काळात राज्याच्या राजकारणातील स्थित्यंतरानंतर शिवसेनेतील अनेक जुने नेते व कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी मोठी ताकद उभी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शिंदे मंत्रिमंडळातील सदस्य व शिवसेना नेते, पदाधिकारी यांनी शिवसेना पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी कंबर कसली आहे. शिवसंघटना अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्यावर भर दिला जात आहे. याद्वारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच लोकसभा, विधानसभा निवडणुकीचीही तयारी सुरू केली आहे. परभणी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) या महायुतीच्या सत्ता काळात परभणी लोकसभा मतदारसंघावर प्रबळ आणि प्रभावीपणे दावा सिद्ध करण्यासाठी शिवसेनेला (शिंदे गट) मजबूत संघटना बांधणीतून सिद्धता गाठावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर परभणी लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनाही भविष्यात मोठी संधी मिळण्याची अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे.