Saibaba Bank : कष्टकऱ्यांच्या उत्कर्षासाठी कटिबद्ध : हेमंतराव आडळकर; सेलूतील साईबाबा बँकेची वार्षिक सभा उत्साहात
दहा टक्के दराने लाभांश वाटप, एक कोटी ५३ लाखांचा नफा
सेलू (जि.परभणी) : येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण रविवारी (१३ ऑगस्ट) उत्साहात पार पडली. या वेळी अध्यक्षीय भाषणात बोलतांना बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर म्हणाले, की समाजाच्या विविध स्तरातील गरजू आणि कष्टकऱ्यांचा उत्कर्ष घडवून आणण्यासाठी साईबाबा बँक कटिबद्ध आहे.
स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजिण्यात आलेल्या या सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक विलास पौळ तसेच उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाणे, पवन आडळकर, गणेशराव नाईकवाडे, सिद्धरामअप्पा हुगे, डी.व्ही.मुळे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
सभासदांना दहा टक्के दराने लाभांश वाटप करण्यात येणार आहे, असे स्पष्ट करून, आडळकर यांनी बॅंकेचा वार्षिक आर्थिक लेखाजोखा मांडला. बँकेचे वसुल भांडवल ५ कोटी ३३ लाख ७ हजार रुपये, असून ठेवी १९० कोटी ४६ लाख ९७ हजार आहेत. ११२ कोटी ७४ लाख ११ हजार रुपयांचे कर्ज वाटप आहे. गेल्या आर्थिक वर्षात बँकेला १ कोटी ५३ लाख ३५ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असून , बँकेची एकूण गुंतवणूक ७७ कोटी ३३ लाख ४८ हजार रुपये आहे. निव्वळ एनपीए ०.४९ टक्के, स्वनिधी १७ कोटी ९३ लाख ४१ हजार रुपये आहे. सभासद संख्या ८१२१ आहे. बॅंक ऑडिटचा अ वर्गप्राप्त आहे. बँकेच्या सर्व सातही शाखा कोअर बँकिंग प्रणालीने जोडल्या गेलेल्या आहेत. बँकेचे कार्यक्षेत्र परभणी, जालना, हिंगोली, नांदेड, बीड असे असून, बँकेचे सर्व व्यवहार ऑनलाईन असून, सर्व सुविधा उपलब्ध आहेत. ग्राहकांनी या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, प्राधान्याने ऑनलाईन व्यवहार करावेत, असे आवाहन हेमंतराव आडळकर यांनी या वेळी केले. बँकेला विविध पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे, असे नमूद करून सभासदांच्या अडीअडचणी, अपेक्षांबाबत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मनमोकळा संवाद साधला.
याप्रसंगी एमपीएससी परीक्षेतील यशाबद्दल श्रीकांत प्रदीप झंवर, तसेच सभासद भगवान शिंदे यांच्या मुलीने एमबीबीएस परीक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल हेमंतराव आडळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालक सुभाष चव्हाण यांनी सविस्तर अहवाल मांडला. विलास पौळ, रहीमखाँ पठाण, कांचन कोरडे, डी.व्ही.मुळे, पुंजाराम निर्वळ, नीलेश मिटकरी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाणे यांनी केले. सूत्रसंचालन वीरेश कडगे, तर संतोष हुगे यांनी आभार मानले. जेष्ठ संचालक कन्हैयालाल बालचंदानी, विधीज्ञ भगवानराव सिससाट, दत्तात्रय माकोडेगुरूजी, अशोकराव अस्वले, दत्तराव पौळ, दत्तात्रय आंधळे, वसंत कुटे, नारायण पाटील, ओमप्रकाश तोष्णीवाल, रहीमखाँ पठाण, डॉ.राजेंद्र मुळावेकर, बाबासाहेब हेलसकर, कांचन कोरडे, निसारखाँ पठाण आदींसह संचालक, सभासद, अधिकारी,कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
बँकेच्या सर्व सातही शाखा कोअर बँकिंग प्रणालीने जोडल्या गेलेल्या आहेत. बँकेचे सर्व व्यवहार ऑनलाईन असून, सर्व सुविधा उपलब्ध आहेत. ग्राहकांनी या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, प्राधान्याने ऑनलाईन व्यवहार करावेत, असे आवाहन हेमंतराव आडळकर यांनी या वेळी केले. सभासदांच्या अडीअडचणी, अपेक्षांबाबत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मनमोकळा संवाद साधला.