संभाजी ब्रिगेड : छगन शेरे यांचा कार्यगौरव
पुणे येथे लोकनेते शरद पवार यांच्या हस्ते सन्मान
सेलू (जि.परभणी) : येथील संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे यांचा सामाजिक चळवळीतील उत्कृष्ट योगदानाबद्दल पुणे येथे आयोजित “केडर कॉन्क्लेव्ह” कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते नुकताच कार्यगौरव करण्यात आला. संभाजी ब्रिगेडच्या वतीने हा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम आदींची उपस्थिती होती. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून छगन शेरे गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ सामाजिक चळवळीत सक्रिय आहेत. मराठा आरक्षण लढा, करोना काळातील करोना उपचार व रिलीफ सेंटर, पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना आर्थिक, भावनिक ताकद, सेलू येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा उभारणी, राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, शिवजयंती उत्सवाला दिलेली सामाजिक, सांस्कृतिक उंची आदी अनेकविध कार्यामध्ये शेरे यांचा पुढाकार महत्त्वपूर्ण आहे. कार्यगौरवाबद्दल सर्वस्तरातून छगन शेरे यांचे अभिनंदन होत आहे.