सामाजिक जीवनात संघटित हिंदुत्व जागविण्याची गरज : स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचे मत
ढालेगाव येथील श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ यज्ञ सोहळा उत्साहात
परभणी : समाज व देशाच्या कल्याणासाठी धर्माचे पालन, सामाजिक जागरण, स्वाभिमान, नैतिक मूल्यांची पुनर्स्थापना करण्याची नितांत गरज आहे. प्रदेश, जातीपाती, संप्रदायाचे सर्व भेदभाव विसरून, सामाजिक जीवनात मी केवळ हिंदू आहे. या भावनेने संघटित हिंदुत्व जागविण्याची आणि सज्जनांच्या प्रभावी संघटनाची आवश्यकता आहे, असे परखड मत श्रीराम जन्मभूमी मंदिर न्यासचे (अयोध्या) कोषाध्यक्ष तथा राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरी महाराज (आचार्य किशोरजी व्यास) यांनी मंगळवारी (१५ ऑगस्ट ) व्यक्त केले.
परभणी जिल्ह्यातील ढालेगाव (ता.पाथरी) येथील श्री समर्थ वेद विद्यालय परिसरात आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात स्वामी गोविंददेव गिरी महाराज बोलत होते. छत्रपती संभाजीनगर येथील रामनिवास मुकुंद गट्टाणी कुटुंबियांच्या वतीने हा सोहळा आयोजिण्यात आला.
मंगळवारी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कथेतील विविध प्रसंगाचे निरुपण करतांना स्वामीजींनी देशातील सद्य परिस्थितीवरही परखड मत व्यक्त केले. ते म्हणाले, की स्वातंत्र्यचा अमृतमहोत्सव साजरा करीत असतांनाच, हे खंडित स्वातंत्र्य आहे, याची जाणीव ठेवून शताब्दीच्या पूर्वीच पूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करण्याचे ध्येय आणि आत्मविश्वास प्रत्येक भारतीयाने बाळगावा. देशासाठी हे वर्ष अत्यंत निर्णायक आहे, असे स्पष्ट करून, शताब्दी येईपर्यंत भारत राष्ट्र सर्वोच्च व्हावे, यासाठी कटिबद्ध व्हावे, असे स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले.
बुधवारी कथेची सांगता झाली.कथा सोहळ्यादरम्यान प्रसंगानुरूप झाँकी सादरीकरण, भजन, कीर्तन झाले. स्वामीजींच्या जीवनावर आधारित नाटिका सादर झाली. वेदविद्यालयातील पुरस्कारप्राप्त शिक्षक भास्कर जोशी; तसेच विद्यार्थी यज्ञेश मुळे यांचा सन्मान; तसेच देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन लक्ष्मीप्रसाद पटवारी यांनी केले. वेदविद्यालयाचे सचिव जयप्रकाश बिहाणी यांनी आभार मानले. कथेच्या यशस्वीतेसाठी वेदविद्यालयाचे अध्यक्ष डॉ.द्वारकादास लड्डा, जयप्रकाश बिहाणी, सीताराम मंत्री, संजय लड्डा, सुरेंद्र तोष्णीवाल, विष्णुकुमार चेचाणी, जगदीश चांडक, मनोज मंत्री, संगीता तिवारी, कमलाकर पाठक, गट्टाणी परिवार आदींसह गीता भवन, संत महात्माजी संस्थानचे पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले. कथेला मराठवाडा, विदर्भासह परिसरातील श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्यचा अमृतमहोत्सव साजरा करीत असतांनाच, हे खंडित स्वातंत्र्य आहे, याची जाणीव ठेवून शताब्दीच्या पूर्वीच पूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करण्याचे ध्येय आणि आत्मविश्वास प्रत्येक भारतीयाने बाळगावा. देशासाठी हे वर्ष अत्यंत निर्णायक आहे, असे स्पष्ट करून, शताब्दी येईपर्यंत भारत राष्ट्र सर्वोच्च व्हावे, यासाठी कटिबद्ध व्हावे, असे स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले.
छायाचित्र सौजन्य : नितीन चव्हाण, छत्रपती संभाजीनगर