दिव्यांग तपासणी शिबिराला सेलू,जिंतूरमध्ये मोठा प्रतिसाद
जिंतूर सेलू तालुक्यातील शेकडो लाभार्थ्यांनी घेतला लाभ, खासदार डॉ.फौजिया खान, माजी आमदार विजय भांबळे यांच्या पुढाकार
सेलू जि.परभणी : केंद्र सरकारच्या दिव्यांग सशक्तीकरण विभागांतर्गत आर्टिफिशियल लिम्बस मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सेलू व जिंतूर येथे मोफत दिव्यांग तपासणी शिबिर आयोजिण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सहाशेहून अधिक दिव्यांगांनी शिबीराचा लाभ घेतला.
दिव्यांग व्यक्तींना सामाजिक दृष्टिकोनातून मदत व्हावी या हेतूने राज्यसभा खासदार डॉ.फौजिया खान, माजी आमदार विजय भांबळे यांच्या पुढाकारातून हे शिबिर आयोजिण्यात आले होते.
जिंतूर तालुक्यातील ३०२, तर सेलूतील ३५१ दिव्यांगांची मोफत तपासणी करण्यात आली. लाभार्थ्यांना कृत्रिम हात, कृत्रिम पाय, कानाचे श्रवण यंत्र, अपंगांसाठी तीन चाकी सायकल, गाडा, चष्मा, काठी, नोटपॅड इत्यादी साहित्य वाटप करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामाजिक दृष्टिकोन जपत दिव्यांगांसाठी भरीव मदत व्हावी या उद्देशाने कृत्रिम अवयव दान करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. याद्वारे दिव्यांगांना मोलाची मदत होणार आहे, असे खासदार फौजिया खान व भांबळे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला तहसीलदार दिनेश झांपले, गणेश मंडलिक, प्रेक्षा भांबळे, अशोक काकडे, राजेंद्र लहाने, प्रकाश मुळे, सुधाकर रोकडे, रामराव उबाळे प्रसाद बुधवंत, साबिया बेगम, कपिल फारुकी, विश्वनाथ राठोड आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.