शासन आपल्या दारी : परभणीमध्ये विविध कार्यक्रम; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती

शासन आपल्या दारी : परभणीमध्ये विविध कार्यक्रम; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती

परभणी : राज्यसरकारच्या सर्व योजना लोकाभिमुख करून त्यांची योग्य अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (२७ ऑगस्ट) सकाळी साडे अकरा वाजता ‘शासन आपल्या दारी’ या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी ही माहिती दिली. दरम्यान, विविध विभाग प्रमुखांसह जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी (२४ ऑगस्ट) कार्यक्रमस्थळाची पाहणी करून आढावा घेतला.
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठातील क्रीडा संकुलाच्या मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत तसेच मंत्रिमंडळातील सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयाचे विविध दस्तावेज, कागदपत्रे उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी यांना एकाच छताखाली आणून विविध योजनांचे लाभ देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील किमान ७५ हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली आहे. या कार्यक्रमात विविध सेवा व योजनांचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तताही स्थानिक पातळीवर करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सरपंचांना निमंत्रण देण्यात आले असून, मुख्यमंत्री शिंदे सरपंच आणि लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. कार्यक्रमस्थळी राज्य सरकारच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती देणारी दालने उभारण्यात येणार आहेत. यात महसूल, जिल्हा परिषद, पोलीस, कृषी, समाज कल्याण, आरोग्य विभाग आदीसह महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांचेही दालन असणार आहे. मुख्यमंत्री सहायता कक्षातर्फे नागरिकांची निवेदने स्वीकारण्यासाठीचे दालन ही असणार आहे. तसेच रोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्यातील प्राचीन ऐतिहासिक वारसा स्थापत्यांची माहिती देणारे प्रदर्शन आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी आणि उपचारांची देखील सुविधा या ठिकाणी करण्यात येणार आहे. यासाठी वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी गावडे बैठकांद्वारे पूर्वतयारी आढावा घेत आहेत. गुरुवारी कार्यक्रमस्थळाला भेट देवून पूर्वतयारीची पाहणी केली. जिल्ह्यातील नागरिकांनी ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गावडे यांनी केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!