शासन आपल्या दारी : लाखो लाभार्थ्यांना मिळाला लाभ : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे
परभणी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्हा प्रशासनाने ‘शासन आपल्यास दारी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातीलजिल्हा प्रशासनातील सर्व विभागांनी आतापर्यंत 8 लाख 74 हजार 738 लाभार्थ्यांना 1446 कोटी 61 लाखाचा लाभ मिळवून दिल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी उपस्थितांना सांगितले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रीष्म वसतिगृहासमोरील मैदानावर आज आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी केले. पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा प्रशासनातील महसूल व इतर सर्व शासकीय विभागांनी शिबिरांचे आयोजन केले. शासनाने निर्धारीत केलेल्या 75 हजार लाभार्थ्यांचा टप्पा दिला होता. मात्र, येथील सर्व विभागांच्या योग्य समन्वयातून प्रशासनाने विशेष अर्थसहाय योजना, नैसर्गिक आपत्ती, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शेतकरी आत्महत्या, नुकसान अनुदान, विविध दाखल्यांतर्गंत 1 लाख 86 हजार 51 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ दिला आहे. तर जिल्हा परिषद अंतर्गत 3 लाख 83 हजार 793, महानगर पालिकेमार्फत 9 हजार 334, जिल्हा अग्रणी बँके अंतर्गत 87 हजार 586, तसेच इतर विभागामार्फत विविध योजनेचा लाभ मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांनी आतापर्यंत 8 लाख 74 हजार 738 लाभार्थ्यांना 1446 कोटी 61 लाखाचा लाभ मिळवून दिल्याचा आनंद असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी यावेळी सांगितले.
प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाची माहिती देताना 28 हजार 755पेक्षा जास्त लाभार्थ्यांशी संपर्क करून 113 कोटीहून अधिक निधी कर्ज स्वरुपात दिल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री रोजगार निमिर्तीच्या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये 39 उद्योगांना एकत्र करत दीड कोटीपर्यंत कर्ज व अनुदान देण्यात आली आहे. रोजगार मेळाव्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या असल्याचे सांगून विशेष मोहीम राबवत अनुकंपा तत्वावर 35 जण तर तलाठी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, शिपायांना पदोन्नती दिल्याचे जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी सांगितले.
एक रुपयामध्ये पिकविमा योजनेतून 7 लाख 61 हजार 823 लाभार्थ्यांना विमा योजनेचा लाभ दिला आहे. याशिवाय 3 हजार 757 शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणामार्फत 27 कोटी अर्थसहाय, खरीप हंगामासाठी 87 हजार 586 शेतकऱ्यांना 684 कोटी 73 लाख पीककर्ज वाटप केले आहे. सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा येथील घटनेतील मयत व्यक्तींच्या 5 कुटुंबातील वारसांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत तातडीने प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी 10 लाख याप्रमाणे 50 लाख मदत तात्काळ वितरीत केल्याचे त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत चौदाव्या हप्त्याचे जिल्ह्यातील एकूण 81 हजार 574 अधिक लाभार्थ्यांच्या खात्यावर 16 कोटी 31 लाख 48 हजार इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे. सप्टेंबर 2022 ते एप्रिल 2023 या कालावधीत अतिवृष्टी, सततचा पाऊस, अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने नुकसानीपोटी 1 लाख 62 हजार 649 शेतकऱ्यांना राज्य शासनाने 70 कोटी 21 लाख 91 हजार निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अमृत काळातील देश लोकाभिमुख राहून सन 2047 पर्यंत एक विकसित राष्ट्र म्हणून सिद्ध करण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन प्रयत्नरत असून, नियोजनबद्ध आराखडा तयार करीत असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील वाढत्या सुविधा, धार्मिक, आध्यामिक आणि पर्यटन स्थळांना योग्य न्याय देण्यासाठी कामकाज सुरू आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न 1 लाख 33 हजार 832 असून, त्यामध्ये वाढ करण्याचे जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचा आत्मा ओळखून या पुढेही परभणी जिल्हा प्रशासन सर्वसामान्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी उपसि्थतांना दिली.
CM Eknath Shinde : सर्वसामान्यांच्या हितालाच सर्वोच्च प्राधान्य : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे