अभियंता लेकानेच बापाला गंडविले; सेलूतील घटना
१४ लाखांची फसवणूक; न्यायालयाच्या आदेशानंतर चौघांविरूध्द गुन्हा
परभणी : सोन्यात गुंतवणूक करुन, वर्षभरात दीडपट परताव्याच्या अमिषातून सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांची, सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या मुलांसह ४ जणांकडून सुमारे १४ लाखांची फसवणूक झाली. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार २५ ऑगस्टरोजी सेलू पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
या बाबत माहिती अशी, की शाम वसंतराव माने (रा. स्वामी विवेकानंद नगर, सेलू) हे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन या पदावरून ३१ ऑक्टोबर २०१७ ला सेवानिवृत्त झाले. त्यानंतर मुलगा अमित शाम माने (पिंपरी चिंचवड, पुणे) व मित्र धिरज पाल, अनिल गात, अमित माने, योगेश मोरे (सर्व रा.पुणे) यांच्या सांगण्यावरून शाम माने यांनी ८ सप्टेंबर २०२० पासून आरटीजीएसद्वारे १२ लाख रूपये बँकेतून दिले. वर्षानंतर १८ लाख रक्कम मिळेल, अशी भुरळ शाम माने यांना पडली. वर्षभरनंतर आणखीन दोन लाख गुंतवणूक केली. मे २०२३ मध्ये चौकशीअंती पुण्यातील संबंधित ज्वेलर्स ही कंपनी नाही. हे बनावट असल्याचे पुढे आले. चौघांनी दिलेला धनादेश बँकेत वटला नाही. याने शाम माने हतबल झाले. त्यानंतर शाम माने यांची फसवणूक झाल्याची तक्रार सेलू ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात घेतली गेली नाही. जुलै २०२३ मध्ये माने यांनी मुलांसह चौघांकडून फसवणूकची फिर्याद सेलू प्रथम वर्ग न्यायालयात उमेश काष्टे यांच्या मार्फत दखल केली. उमेश काष्टे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मंदार राऊत यांनी आरोपी धिरज पाल, अनिल गात, अमित माने, योगेश मोरे यांच्यावर फसवणुकीचा दाखल करावा, असा आदेश पोलीस निरीक्षक सेलू यांना दिला. २५ ऑगस्टला सेलू ठाण्यात पोलिस निरीक्षक समाधान चवरे यांचे आदेशान्वये गुन्हा दाखल झाला. सहायक पोलिस निरीक्षक जटाळ तपास करीत आहेत.
हुतात्म्यांच्या बलिदानातून हैदराबाद मुक्तिसंग्राम यशस्वी : ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव