खून प्रकरणातील आरोपी पंजाब पोलिसांकडे स्वाधीन; सेलू पोलिसांच्या मदतीने ठोकल्या बेड्या
सेलू जि.परभणी : खून करुन पसार झालेल्या पंजाब राज्यातील एका आरोपीला पंजाब पोलिसांनी, सेलू ठाण्याचे पोलिस निरीक्षक समाधान चवरे व पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने ताब्यात घेतले. सेलू शहरातील एका हॉटेलमधून मंगळवार, २९ ऑगस्टरोजी ताब्यात घेण्यात आलेला आरोपी सेलू पोलिसांनी पंजाब पोलिसांच्या स्वाधीन केला. कोमलप्रीत सिंग अवतार सिंग ( रा.डेराबाबा, नानक रोड, हवेलिया ता. भटाला जि.गुरुदासपुर) असे आरोपीचे नाव आहे.
या बाबत माहिती अशी की, पंजाब राज्यातील कलनोर (जि.गुरुदासपुर) पोलीस ठाण्यामध्ये २०२२ मध्ये खून, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे या कलमाखाली गुन्हा नोंद झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी कोमलप्रीत सिंग अवतार सिंग ( रा.डेराबाबा, नानक रोड हवेलिया ता. भटाला, जि.गुरुदासपुर) फरार होता. हा आरोपी सेलू शहरातील एका हॉटेलमध्ये लपून बसला असल्याची माहिती पंजाब पोलिसांना मिळाली. प्रभारी अधिकारी मेजरसिंग यांनी सेलू पोलिसांना संपर्क साधला. त्यानुसार पंजाब पोलिसांचे एक पथक सेलू शहरात दाखल झाले होते. सेलू ठाण्याचे पोलिस निरीक्षक समाधान चवरे व पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेण्यात आले. सेलू पोलिसांनी आरोपीला पंजाब पोलिसांच्या स्वाधीन केले. पथकामध्ये पंजाब पोलिस दलातील गुरमित सिंग, सुरेंद्र सिंग आदींचा समावेश होता.