Parent Teacher Sangha : मोबाइलवरील टाईमपास धोकादायक; सेलूतील नूतन विद्यालय पालक शिक्षकांची सभा उत्साहात
मुख्याध्यापक नारायण सोळंके यांचे मत, नूतन विद्यालय पालक शिक्षक संघाच्या सभेत विविध प्रश्नांवर चर्चा
सेलू जि.परभणी : उपयुक्ततेऐवजी विद्यार्थ्यांचा मोबाइलवरील टाईमपास वाढला आहे. शैक्षणिक, सामाजिक व मानसिकदृष्ट्या ही सवय अत्यंत धोकादायक व चिंताजनक ठरू लागली आहे. याकडे शिक्षक, पालक आणि माता पालकांनीही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे मत नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष नारायण सोळंके यांनी व्यक्त केले.
सेलू(जि.परभणी) येथील नूतन विद्यालय पालक शिक्षक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (२९ ऑगस्ट) उत्साहात पार पडली. त्या वेळी सोळंके बोलत होते. याप्रसंगी उपमुख्याध्यापक संतोष पाटील, किरण देशपांडे, देविदास सोन्नेकर, सुरेखा खिल्लारे, सतीश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. सोळंके म्हणाले, की पाल्यांच्या अभ्यासाकडे पालकांनी
वेळ काढून लक्ष द्यावे. मुलामुलींच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
आरती पांडव यांनी, मुलींच्या विविध समस्यांबाबत पालक शिक्षक सुसंवाद गरजेचा आहे. सामाजिक मानसिकता ओळखून मुलींच्या स्वच्छतागृह स्वच्छतेकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. ‘नूतन’ गुणवंतांची खाण आहे. मात्र, कौशल्यात्मक उपक्रमांवर अधिक भर द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. सुरेखा खिल्लारे, सतीश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शिक्षक, पालकांनी आरोग्य, शिक्षण, सामाजिक विकास आदी विविध प्रश्नांवर चर्चा केली. पालक शिक्षक संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून आरती पांडव, सहसचिव वैजनाथ मोळे, माता पालक संघाच्या उपाध्यक्षपदी प्रज्ञा कुलकर्णी, सहसचिव आश्विनी मिरजे, तर परिवहन समितीमध्ये शिवाजी कटारे, राजू चव्हाण, लक्ष्मण सोळंके यांची निवड करण्यात आली. सूत्रसंचालन सचिव परशराम कपाटे यांनी केले. प्रास्ताविक किरण देशपांडे यांनी केले. सोन्नेकर यांनी आभार मानले.