Anandacha Shidha : गौरी गणपतीला परभणी जिल्ह्यातील तीन लाखांवर लाभार्थ्यांना मिळणार ‘आनंदाचा शिधा’
परभणी : राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना गौरी-गणपती या सणासाठी आनंदाचा शिधा मिळणार आहे. यामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल या शिधाजिन्नसांचा समावेश असून, जिल्ह्यातील ३ लाख ७ हजार १४५ पात्र लाभार्थ्यांना १०० रुपयांमध्ये शिधा मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले आहे.
पात्र लाभार्थ्यांना हे शिधाजिन्नस संच गौरी- गणपती उत्सवानिमित्त प्रतिशिधापत्रिका एक शिधाजिन्नस संच ई-पॉस प्रणाली द्वारे १०० रुपये प्रतिसंच या सवलतीत वितरीत करण्यास अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नुकतीच मंजुरी दिली आहे. राज्य शासनाकडून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब योजना नियमित मोफत धान्य योजना या व्यतिरिक्त हे अतिरिक्त पॅकेज अतिशय स्वस्त दरात मिळणार आहे. जिल्ह्यासाठी आवश्यक शिधाजिन्नस संचाची मागणी पुरवठा विभाग परभणीतर्फे शासनाकडे नोंदविण्यात आली होती. त्यानुसार परभणी जिल्ह्यासाठी शासनाकडून ३ लाख ७ हजार १४५ इतके शिधाजिन्नस संच मंजूर करण्यात आले आहेत. तसेच तालुका गोदामांपर्यंत शिधाजिन्नस संच कंत्राटदार पोहोचविणार आहेत. शिधाजिन्नस संचात समाविष्ट शिधाजिन्नस एफएसएसएआय मानकाची पूर्तता करीत असल्याचे एनएबीएल प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र पुरवठादाराकडून प्राप्त करून घेतल्यानंतरच हे स्विकारण्याच्या सूचना शासनास्तरावरून देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील अंत्योदय योजनेत ४३ हजार ३४०, प्राधान्य कुटुंब योजनेत २ लाख २२ हजार ६३८ आणि एपीएल शेतकरी योजनेतून ४१ हजार १६८ असे एकूण ३ लाख ७ हजार १६७ पात्र लाभार्थ्यांना आनंदाचा शिधाचा लाभ मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांनी गौरी-गणपती उत्सवानिमित्त ४ शिधाजिन्नसांचा समावेश असलेला ‘आनंदाचा शिधा’ संच १०० रुपयांमध्ये संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराकडून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री.गावडे यांनी केले आहे