गुटखा-नव्या रंगढंगात : सेलूतील गुटखा गब्बर सक्रिय; लपूनछपून विक्री वाढली, नोटासा गेल्या चुलीत
सेलू जि.परभणी : सेलू पोलिस ठाण्याचे निरीक्षक समाधान चवरे यांच्या नोटिशीनंतर शहरात दहा – पंधरा दिवस बंद झालेली अवैध गुटखा विक्री आता नव्या रंगढंगात अव्वाच्या सव्वा दराने जोरात सुरू झाली आहे. ठोक व घाऊक विक्रेत्या गुटखा गब्बरांनी डुप्लिकेट गुटखा उत्पादक व पुरवठादारांना संधान साधून, सेलू शहरासह परिसरात विविध प्रकारचा गुटखा सहज उपलब्ध करून देण्याची मोहीम उघडली असल्याचे बोलले जात आहे. याच मंडळींनी ‘साहेब मॅनेज झाले.’अशी बतावणी करून अफवा उठविली आहे. त्याचा फायदा घेत गुटखा गब्बर पुरवठादाराकडून चोरट्या मार्गाने व विविध क्लृप्त्या लढवून मोठ्या प्रमाणावर परराज्यातून आणलेल्या गुटख्याची शहर व परिसरात बिनबोभाट विक्री करू लागल्याचे चित्र चर्चेत आहे. याद्वारे हजारो रुपयांची उलाढाल होत आहे. विशेष म्हणजे शाळा, महाविद्यालयातील काही विद्यार्थी, तरूणांमध्ये आरोग्यास हानीकारक असलेली गुटखा खाण्याची सवय वाढीस लागली आहे. काही तरूण या विळख्यात आडकले जाऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, बंदी असतानाही परराज्यातून गुटखा आणून विकण्याच्या धंदेवाईक सवयीच्या गुलामांच्या मुसक्या वेळीच आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. शहरात भेसळयुक्त हानीकारक रसायनांचा समावेश असलेल्या आरएमडी, गोवा, राजनिवास आदींसह व सर्व प्रकारचे पानमसाले लपून छपून विकले जात आहेत. परभणी शहर व जिल्ह्यात याची मोठी साखळी निर्माण झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी या कडे सरळसोट दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. याच्याशी कुणाला काहीही गांभीर्य नाही. मात्र, ‘देणेघेणे’ सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.
नोटीस काय सांगते :
कलम १४९ सीआरपीसी प्रमाणे दोन ऑगस्ट २०२३ रोजी शहरातील दोनशेहून अधिक पानपट्टी व दुकानदार यांना सेलू ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनी नोटीसा बजावल्या होत्या. त्यातील मजकूर असा आहे :
आपणास याव्दारे नोटीस देण्यात येते की, आपण आपली चालवत असलेली पानपटटी, दुकानात मध्ये कोणत्याही प्रकारचे प्रतबंधीत पदार्थची विक्री करू नये. महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांचे आदेशान्वये गोवा गुटखा, पान मसाला, जाफरानी जर्दा व तत्सम पदार्थ सार्वजनिक विक्रीस बंदी घालण्यात आली असून आरोग्याच्या दृष्टीने जनतेस धोका होईल, असे तत्सम पदार्थ आपल्या पान सेंटरवर विकल्या जाणार नाहीत. यांची खबरदारी घ्यावी. सदर पदार्थाची विकी, जवळ बाळगणे हा भारतीय दंड सहीता कलम ३२८ सह अन्य कलमान्वये अपराध आहे.
तरी वरील तत्सम पदार्थ व शासनाने बंदी घातलेल्या जनतेच्या आरोग्यास धोका होईल, असे वरील तत्सम पदार्थांपैकी कोणत्याही पदार्थांची आपण आपली चालवत असलेली पानपटटी, दुकानामध्ये होत असल्याचे आढळून आल्यास त्यास आपणास जबाबदार धरून आपणावर प्रचलीत कायदयातील विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व त्यावेळी सदर नोटीस मा. न्यायालयात पुरावा म्हणुन वापरण्यात येईल यांची नोंद घ्यावी. सदरची नोटीस आज रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिली. – पोलिस निरीक्षक, पोलिस ठाणे, सेलू
या नोटिसीचा परिणाम दहा-पंधरा दिवस दिसून आला. काही कारवाया झाल्या. पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे. त्यांनतर खर्रा (जाफरानी तंबाखू, चुना व अन्य रसायन मिश्रीत गुटखा ) विक्रीवरील बंदीविरोधात पोलिसांनी पाऊल उचलले. त्यामुळे शहरातील रोजीरोटीचा प्रश्न म्हणून संबंधित पानटपरी धारकांनी काही बड्या लोकांना मध्यस्थी केले. हे थांबले , तर धंदा काय करावा, घर कसे धकवावे, असे प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे खर्रा विक्री सुरूच आहे. या खर्रा विक्रीसह, विविध पान, सिगारेट, बिडी, पाणी बॉटल, अगरबत्ती, चॉकलेट, पेन आदी साहित्य विक्रीतून पानपट्टी चालकांचा उदरनिर्वाह चालतो. गोवा गुटखा व अन्य गुटखा विक्रीतून दोन-तीनशे रूपये मिळतात. हा तोटा सहन करून पानपट्टीवर पोट असलेली तीनशेवर कुटुंबे शहरात आहेत. मात्र, बंदी असतांनाही परराज्यातील पुरवठादार, उत्पादक व शहरातील गुटखा गब्बरच्या चक्रव्यूहात काही पानपट्टी चालक अडकले जाऊन भेसळयुक्त गुटखा विक्रीला बळी पडत आहेत. त्यामुळे या गुटखा गब्बरांच्या मुसक्या आवळण्याचे धाडसी आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर अवैध व भेसळयुक्त गुटखा विक्री होते, याकडेही अन्न औषध प्रशासन व पोलिसांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी होत आहे.
खर्रा विक्रीसह, विविध पान, सिगारेट, बिडी, पाणी बॉटल, अगरबत्ती, चॉकलेट, पेन, हात रूमाल आदी साहित्य विक्रीतून पानपट्टी चालकांचा उदरनिर्वाह चालतो. गोवा गुटखा व अन्य गुटखा विक्रीतून दोन-तीनशे रूपये मिळतात. हा तोटा सहन करून पानपट्टीवर पोट असलेली तीनशेवर कुटुंबे शहरात आहेत. मात्र, बंदी असतांनाही परराज्यातील पुरवठादार, उत्पादक व शहरातील गुटखा गब्बरच्या चक्रव्यूहात काही पानपट्टी चालक अडकले जाऊन भेसळयुक्त गुटखा विक्रीला बळी पडून जिवाशी खेळत आहेत. त्यामुळे शहरातील ठोक गुटखा गब्बर विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Saibaba Bank : सेलूतील साईबाबा बँक पद्मभूषण वसंतदादा पाटील पुरस्काराने सन्मानित