Sports : खेळातून साधते एकाग्रता : डॉ.सुनील कुलकर्णी; जिल्हा टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा उत्साहात
सेलू : खेळातून शरीर आणि मन सदृढ राहाते. निरोगी व दीर्घायुष्य लाभते. विशेष म्हणजे मनाची एकाग्रता वाढते. त्यासाठी शालेय जीवनात भरपूर खेळले पाहिजे. विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाले पाहिजे, असे प्रतिपादन श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे उपाध्यक्ष तथा हृदय तज्ज्ञ डॉ.सुनील कुलकर्णी यांनी केले.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १३ सप्टेंबररोजी आयोजिण्यात आलेल्या जिल्हा शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी कुलकर्णी बोलत होते. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय परभणी, परभणी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन, तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका क्रीडा संकुल सेलू येथे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सुनील कुलकर्णी होते, उद्घाटक म्हणून डॉ.प्रताप घांडगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नूतन विद्यालयातील जेष्ठ क्रीडा शिक्षक सतीश नावाडे, तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे, आहार तज्ज्ञ डॉ.अजिंक्य धन, राष्ट्रीय प्रशिक्षक चेतन मुक्तावार आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील १४, १७ व १९ वर्षे आतील मुले व मुलींच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला. प्रास्ताविक तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे , सूत्रसंचालन अमर ठाकुर, तर निखिल झुटे यांनी आभार मानले.
स्पर्धेचा अंतिम निकाल: १४ वर्षे मुले : नूतन विद्यालय सेलू (प्रथम), बोर्डीकर पोदार इंग्लिश स्कूल सेलू (व्दितीय), १४ वर्षे मुली: नूतन विद्यालय सेलू (प्रथम), १७ वर्षे आतील मुले : नूतन विद्यालय सेलू(प्रथम), व्हिजन इंग्लिश सेलू (व्दितीय), १९ वर्षातील मुले : रामराव लोहट पब्लिक इंग्लिश स्कूल धर्मापुरी (प्रथम), १९ वर्षे आतील मुली : कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गंगाखेड (प्रथम), पंच म्हणून, निखिल झुटे, अभिजित जाजू , अजिंक्य घन, चेतन मुक्तावार , मनोज गोरे, यांनी काम पाहिले.
नाकापेक्षा मोती जड’ नाटकाला पारितोषिक;सेलूच्या महिला कलाकारांचा सहभाग_