गिरीश लोडाया यांचे निधन; सेलूच्या सांस्कृतिक, क्रीडाक्षेत्रातील उमदा मार्गदर्शक हरपला
सेलू (जि.परभणी) : सेलू शहराच्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक व क्रीडाक्षेत्रातील कार्यकर्ते, उमदे मार्गदर्शक गिरीश मेघजीभाई लोडाया (वय ७३) यांचे मंगळवारी, १९ सप्टेंबररोजी सकाळी नऊच्या सुमारास डोंबिवली (मुंबई) येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, दोन मुली, मुलगा अनुज, सून, नातवंडे असा परिवार आहे. नूतन विद्यालयातून जेष्ठ लिपिक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर लोडाया यांनी संस्थेच्या कार्यालयातही सेवा दिली. सेलू शहरातील शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रामध्ये लोडाया यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. ‘गिरीशसर’ म्हणून त्यांची ओळख होती. अनेक क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धा, उत्सवाच्या आयोजनामध्ये संयोजक म्हणून त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी पार पाडलेली आहे. ६२ वर्षांची परंपरा लाभलेल्या गणेशोत्सव व्याख्यानमालेचे चिटणीस म्हणून गेल्या २७ वर्षांपासून ते कार्यरत होते. या माध्यमातून विविध ज्वलंत विषयावर प्रबोधन घडवून आणण्यासाठी लोडाया यांनी पुढाकार घेतला. अनेक स्थानिक कलाकार, वक्त्यांना त्यांनी विचार आणि आविष्कारपीठ उपलब्ध करून दिले. लोडाया यांच्या निधनामुळे सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा चळवळीतील एक उमदा कार्यकर्ता, मार्गदर्शक हरपला आहे. अशा शब्दांत विविध स्तरांतून भावना व्यक्त केल्या जात आहेत.