सण… श्रीमहालक्ष्मीचा : सेलूतील रामपूरकर कुटुंबियांनी साकारला मुक्तिसंग्रामातील प्रसंगांचा देखावा
देखावा पाहाण्यासाठी येण्याचे अरूण रामपूरकर यांचे आवाहन
सेलू (जि.परभणी) : येथील ब्राह्मण गल्लीतील बेबीताई अरुण रामपूरकर कुटुंबियांनी हैदराबाद मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, जेष्ठा गौरी – गणपती (महालक्ष्मी) निमित्ताने मुक्तीसंग्रामातील प्रसंगाच्या देखाव्यातून हुतात्म्यांना अभिवादन केले आहे. स्वातंत्र सैनिकांची छायाचित्रे, उमरी बँक दरोडा, स्वातंत्र सैनिक-रझाकार चकमक, घरोघरी सुतकताई, निजामकालीन नाणी, मुक्तिसंग्राम स्मृतिस्तंभ प्रतिकृती आदींचा देखाव्यामध्ये समावेश आहे. देखावा तयार करण्यासाठी गोविंद अरुण रामपूरकर गोपाल अरुण रामपूरकर यांनी हीरिरीने सहभाग घेतला.
गेल्या २७ वर्षापासून रामूपरकर परिवाराने देखाव्याची परंपरा जपली आहे. दरवर्षी महालक्ष्मीच्या सणाला एखादा विचार घेऊन देखावा सादर करतो. सेवा करण्याचा प्रयत्न करतो. हे वर्ष हैदराबाद मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. म्हणून या वर्षी हैदराबाद मुक्तिसंग्रामांचा देखावा सादर केला आहे, असे अरूण रामपूरकर यांनी सांगितले. सेलू हे हैदराबाद मुक्ती संग्रामातील चळवळीचे प्रमुख केंद्र होते. पूज्य स्वामी रामानंद तीर्थांच्या नेतृत्वाखाली येथील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी या लढ्यात भाग घेतला. मी ज्या शाळेत नूतन विद्यालयात सेवा करतो. त्या शाळेने, संस्थेनेही या स्वातंत्र्यलढ्यात मोठा सहभाग घेतला. या शाळेचे उद्घाटनही पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले. म्हणून आज हैदराबाद मुक्तिसंग्रामाला ७५ वर्ष होत असताना पूज्य स्वामी रामानंद तीर्थ व थोर देशभक्त ,स्वातंत्र्य सैनिकांना विनम्र अभिवादन करतो. हैदराबाद मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयार केलेला देखावा पाहाण्यासाठी सर्वांनी आवार्जून यावे, असे आवाहन अरूण रामपूरकर यांनी केले आहे.