श्रीगणेशोत्सव : सेलूतील बाप्पांची मिरवणूक उत्साहात; वरुणराजाचीही हजेरी
शिस्तबद्ध पद्धतीने शांततेत मिरवणूक, ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन
श्रीगणरायांच्या विसर्जनानिमित्त शहरातील विविध गणेश मंडळांनी; तसेच श्री सिद्धिविनायक मंदिरात पारंपरिक महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन करण्यात आले होते, तर माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे मित्रमंडळाच्या वतीने भक्तांसाठी खिचडीच्या प्रसादाची गेल्या २७ वर्षांची परंपरा या वर्षीही जपल्याचे दिसून आले.
सेलू जि.परभणी : गेल्या दहा दिवसांपासून शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला. गुरुवारी, २८ सप्टेंबररोजी बाप्पांची विसर्जन मिरवणूक शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. दरम्यान, बाप्पांना निरोप देण्यासाठी वरुणराजानेही हजेरी लावली.
शहरात जवळपास ७० सार्वजनिक मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली होती. विविध गणेश मंडळांनी देखावे, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांवर भर दिल्याचे दिसून आले. दरम्यान, घरोघरच्या गणपती विसर्जनाच्या दृष्टीने पालिका प्रशासनाने घंटा गाड्यांची व्यवस्था केली होती. सायंकाळी साडेसहा दरम्यान पाऊस झाल्याने काही सार्वजनिक मंडळांनी गणेश मूर्तीची परिसरातच मिरवणूक काढून विसर्जन केले. सायंकाळी सात वाजता भर पावसात ढोलताशांच्या निनादत काही मंडळांनी बाप्पांची उत्साहात मिरवणूक काढली. क्रांती चौकात भारतीय जनता पक्ष व महाविकास आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. वरीष्ठ पोलिस अधिकारी, तहसीलदार दिनेश झांपले, पोलिस निरीक्षक समाधान चवरे, तलाठी मुकुंद आष्टीकर यांच्यासह विविध सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री गणरायांच्या विसर्जनानिमित्त शहरातील विविध गणेश मंडळांनी; तसेच श्री सिद्धिविनायक मंदिरात पारंपरिक महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन करण्यात आले होते, तर माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे मित्रमंडळाच्या वतीने भक्तांसाठी खिचडीच्या प्रसादाची गेल्या २७ वर्षांची परंपरा या वर्षीही जपली. विसर्जन मिरवणूक शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावी, यासाठी पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस, प्रशासन व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या पुढाकाराने या वर्षी ध्वनिप्रदूषण कमी झाल्याचे दिसून आले.