Swachhata Hi Seva : मोहीम लोकचळवळ व्हावी : डॉ.संजय रोडगे
सेलू बसस्थानक परिसरात श्रमदान
सेलू जि.परभणी : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त येथील श्रीराम प्रतिष्ठान, आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार आणि नगरपालिका यांच्या संयुक्त सहकार्याने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत “ एक तारीख : एक तास महाश्रमदान स्वच्छता मोहीम ” बसस्थानक परिसरात रविवार एक ऑक्टोबररोजी राबविण्यात आली. याप्रसंगी बोलताना डॉ.संजय रोडगे म्हणाले, ” ‘स्वच्छता ही सेवा’ ही मोहीम लोकचळवळ व्हावी.”
अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा बाजार समिती संचालक डॉ.संजय रोडगे, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, मुख्याधिकारी देविदास जाधव, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड.दत्ताराव कदम, जयसिंग शेळके, प्रफुल बिनायके, अशोक पटवारी, प्रभाकर सुरवसे, श्रीराम प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे जिल्हा समन्वयक किशोर घडे, कैलास कदम, रामा वैद्य, प्रकाश चेचेडीया, संतोष शर्मा, अनुज गुप्ता, रुचीका गुप्ता, स्वप्निता ढवळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ.रोडगे म्हणाले की, समृद्धी आणि आरोग्यदायी आयुष्यासाठी दैनंदिन स्वच्छता महत्त्वाची आहे. त्यामुळे स्वच्छता अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने एक तास स्वच्छतेसाठी द्यावा. जिथे कुठे असाल, तिथे आपण स्वच्छता मोहिम राबवून या अभियानात योगदान द्यायचे आहे.
स्वच्छ भारत अभियान गेल्या ७ वर्षापासून सेलू शहरात नगर राबविले जात आहे. घरोघरीचा कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाडीची व्यवस्था करण्यात आली. या अभियानात सेलू नगरपालिकेचा महाराष्ट्रात ३ रा क्रमांक व देशात २० वा क्रमांक, स्वच्छ शहर म्हणून राज्य व देश पातळीवर सन्मान करण्यात आला आहे. हे गौरवास्पद बाब आहे, असे मुख्याधिकारी देविदास जाधव म्हणाले. महाश्रमदान स्वच्छता मोहीमेला श्रीराम प्रतिष्ठान संस्थेतील प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारचे साधक पालिका कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. सूत्रसंचालन दिगंबर टाके यांनी केले. आभार संजय ठाकर यांनी मानले.