कंत्राटीकरणाविरोधात सेलूत जोरदार धरणे आंदोलन
राज्य शिक्षण संस्था महामंडळासह विविध पक्ष, सामाजिक संघटनांचा सहभाग
सेलू जि.परभणी : राज्य शिक्षण संस्था महामंडळासह विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने सेलू तहसील कार्यालयासमोर आयोजित धरणे आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळाला. या वेळी बोलतांना संस्थाचालक महामंडळाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र लहाने म्हणाले, की मोफत आणि सक्तीचे शैक्षणिक धोरण अवलंबिले तरच देश पुढे जात असतो. कंत्राटीकरण, खाजगीकरण सर्वसामान्य माणसाला मारक आहे. त्यामुळेच शिक्षण व्यवस्था संपू पाहाणारे आदेश सरकाराने तात्काळ रद्द केले पाहिजेत.
राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून दोन ते सात ऑक्टोंबर दरम्यान आयोजित महाराष्ट्र शैक्षणिक संघर्ष सप्ताहाअंतर्गत दोन ऑक्टोबररोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ संलग्न परभणी जिल्हा शिक्षण संस्था महामंडळ व मुख्याध्यापक संघ, विविध शिक्षक संघटना, इतर सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कंत्राटी शिक्षक भरती, समूह शाळा, शाळा दत्तक योजनांचा आदेश शासनाने तात्काळ रद्द करावा या व इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, डी.व्ही.मुळे, चंद्रप्रकाश सांगतानी, महेश खारकर, माजी जिल्हा परिषद सभापती अशोक काकडे, रामनाना खराबे, साईराज बोराडे, मुंजाजी भिसे आदींसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला. राजेंद्र लहाने म्हणाले की, ‘ सर्वसामान्यांच्या शिक्षण या मुलभूत अधिकारावर गदा येते आहे. म्हणूनच कंत्राटी शिक्षक भरती, समूह शाळा, शाळा दत्तक योजना या सरकारच्या आदेशा विरुद्ध आवाज उठविला पाहिजे. त्यासाठी एकजुट होऊन लढावे लागेल. याप्रसंगी माजी मुख्याध्यापक काशिनाथ वाघमारे, पी.जी.बोराडे, धनंजय भागवत, रहिम खान पठाण, विधीज्ञ विष्णू ढोले, कॉ.रामेश्वर पौळ यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक सर्जेराव लहाने यांनी प्रास्ताविक केले. विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार अनिकेत पालेपवाड यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. काशिनाथ पल्लेवाड, सुरेश हिवाळे, योगेश ढवारे,कॉ.दत्तुसिंग ठाकूर, सुभाष शहाणे, चंद्रशेखर नावाडे आदींसह शहरातील शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक संघ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, क्रीडा शिक्षक, विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला.