नवरात्र महोत्सव : सेलूतील गरबा प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद; श्रीराम प्रतिष्ठानचा उपक्रम
सेलू जि.परभणी : येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल व क्युरिअस किड्स आयोजित नवरात्र महोत्सवानिमित्त तीन दिवसीय गरबा प्रशिक्षण शिबिराला शनिवारी, सात ऑक्टोबररोजी श्री साईबाबा मंदिर सभामंडपात सुरुवात झाली. प्रशिक्षणाला सेलूतील मुली आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिराचे उद्घाटन भाजपा जिल्हा सरचिटणीस बबिता ठाकुर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, आयोजक तथा संस्थेच्या सचिव डॉ.सविता रोडगे, पौर्णिमा जोहिरे, भाजपा महिला तालुकाध्यक्षा वनिता चाफेकर भाजपा महिला शहराध्यक्षा रुपा ठाकुर, श्रीमती राजुरकर, गरबा प्रशिक्षक गीतांजली घाणेलु, वैशाली साबळे, मिनाक्षी रत्नपारखी, शालिनी शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
सेलू शहरातील महिला व मुलींकरिता खास गरबा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन श्रीराम प्रतिष्ठानने केले. प्रशिक्षण शिबिरामध्ये सॅनेडो, डाकला दांडिया, गरबा फ्यूजन रास आदी डान्स प्रकार शिकविण्याकरिता मुंबई येथील कलांजली नृत्य इन्स्टिट्यूटच्या संचालिका गीतांजली घाणेलु उपस्थित आहेत. मुली व महिलांनी आपल्यातील उपजत कलागुणांना वाव दिला पाहिजे. या उद्देशानेच श्रीराम प्रतिष्ठान ही शैक्षणिक संस्था वेळोवेळी विविध कार्यक्रम आयोजित करते. शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक क्षेत्रात देखील श्रीराम प्रतिष्ठानने अनेक उपक्रम राबविले आहेत. सर्व महिलांनी गरबा प्रशिक्षण शिबीरचा मनसोक्त आनंद घेत सर्व कलाप्रकार शिकावेत. येणाऱ्या नवरात्र महोत्सवामध्ये उत्कृष्ट प्रकारे सर्व कलाप्रकारासह दांडिया खेळाव्यात. श्रीराम प्रतिष्ठानतर्फे दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. त्यामध्ये सहभागी व्हावे, असे डॉ.सविता रोडगे म्हणाल्या. सूत्रसंचालन कल्पना भाबट यांनी केले, तर आभार निशा तोष्णीवाल, स्मिता शर्मा यांनी मानले.