Saibaba Bank : सेलूतील साईबाबा बँकेचा बँको पुरस्काराने सन्मान
उत्कृष्ट योगदानाबद्दल दमण येथे झाला सलग दहाव्यांदा गौरव, नागरी सहकार क्षेत्रातील बॅंकेची यशस्वी घोडदौड कायम
संचालक, सभासद, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रम, सहकार्यामुळेच सलग दहाव्यांदा बँकेचा ‘बँको ब्लु रिबन’ पुरस्काराने सन्मान झाला आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे यश स्पृहणीय व कौतुकास्पद आहे. – हेमंतराव आडळकर, संस्थापक अध्यक्ष, साईबाबा बॅंक, सेलू
सेलू जि.परभणी : सव्वा तीनशे कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय असणाऱ्या आणि परभणी जिल्ह्यातील अग्रगण्य व ‘आपली बँक’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या सेलू (जि.परभणी) येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेस राज्यातील नागरी सहकार क्षेत्रातील भरीव व उत्कृष्ट योगदानाबद्दल अविज पब्लिकेशनच्या वतीने सलग दहाव्यांदा ‘ बँको ब्ल्यू रिबन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गुरुवारी, पाच ऑक्टोबररोजी दमण येथे आयोजित कार्यक्रमात आरबीआयचे माजी सीजीएम पी.के.अरोरा, बॅंको संचालक अशोक नाईक, अविनाश शिंत्रे आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाणे, संचालक तथा माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, राजेंद्र आडळकर, कन्हैयालाल बालचंदानी, दत्ताराव आंधळे, सुभाष चव्हाण, ॲड.भगवान शिरसाठ, शेख इम्रान, गंगाधर आडळकर, सुनील आडळकर, शेख जुनैद आदींनी हा पुरस्कार स्वीकारला. महाराष्ट्र अर्बन कॉर्पोरेशन बँक्स असोसिएशन मुंबई यांच्याकडून उत्कृष्ट बँकेच्या वसंतदादा पाटील पुरस्काराने नुकतेच बँकेला गौरविण्यात आले. त्यापाठोपाठ दहाव्यांदा बँको पुरस्काराने सन्मान झाल्याने बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला बळकटी देणाऱ्या संस्थाना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे. या हेतूने राज्यातील सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेची रिझर्व्ह बँकेच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या समितीद्वारे निकषांच्या आधारे माहिती घेऊन परिक्षण केले जाते. यामध्ये साईबाबा नागरी बँक अव्वल ठरली आहे. बँकेचा वाढता व्यवसाय, उत्कृष्ट आर्थिक स्थिती व सृदृढ परिस्थिती यासोबतच शिल्लक नफा, राखलेली भांडवल पर्याप्तता, ठेवीदारांची सुरक्षितता व सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा या साठी साईबाबा नागरी बँकेचा सलग दहाव्यांदा बँको पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. साईबाबा नागरी बँकेच्या सेलू, परभणी, मानवत, वालूर, जिंतूर, बोरी अशा सहा शाखेतून कार्य करत आहे. संस्थेने आपल्या सर्वच शाखा सुसज्ज व संगणीकृत असून ग्राहकांना आरटीजीस, एनएफटी, मोबाईल बँकिंग, एटीम, क्यूआर कोड अशा सर्व आधुनिक तंत्रज्ञानाच्या सोयी ग्राहकांना देत आहे. सर्वच शाखांमध्ये तज्ज्ञ अधिकारी, कर्मचारी ग्राहकांना सेवा देण्यास सदैव तत्पर असतात. संचालक, सभासद व ग्राहकांच्या सातत्यपूर्ण सहकार्यामुळेच सलग दहाव्यांदा बँकेचा ‘बँको ब्लु रिबन’ पुरस्काराने सन्मान झाला आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे यश स्पृहणीय व कौतुकास्पद आहे. पुरस्काराबद्दल साईबाबा नागरी सहकारी बँक संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.
Selu Doctors Association : अध्यक्षपदी डॉ.ऋतुराज साडेगावकर; डॉ.आशिष मेहता सचिव