National Highway-548-B : वर्षभरापासून साडेपाच किलोमीटर रस्त्याचे काम सुरूच
डिग्रस बरसाले-सेलू शहर रस्ता : संथगतीमुळे वाहतुकीचा खोळंबा, अधिकार्यांचा कानाडोळा, सेलूतून संताप
साडेपाच किलोमीटर पैकी अडीच किलोमीटर रस्ता सेलू शहरातील प्रमुख रस्त्याचा भाग आहे. रायगड कॉर्नर-जिंतूर नाका-पाथरी रेल्वे गेटपर्यंत चौपदरी सिमेंट क्रॉंकिटीचा रस्ता होत आहे. दुभाजकासह साडेसात-साडेसात मीटर रुंद रस्ता, नाल्याच्या दोन्ही बाजूला विद्युतीकरण व जलवाहिनीसाठी दीड-दीड मीटर जागा आहे. काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाल्यावर सेलू शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे.
सेलू जि.परभणी : सेलू् शहर व परिसरातून जाणाऱ्या कोट्यवधी रुपये खर्चाच्या ५४८ (ब) अंतर्गत डिग्रस बरसाले पाटी ते सेलू शहर या साडेपाच किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या वर्षभरापासून अत्यंत संथगतीने सुरू आहे. कामाचा सुमार दर्जा आणि गुणवत्तेबाबत तक्रारी वाढल्या आहेत. वाहतुकीचा मोठा खोळंबा आणि किरकोळ अपघातात भर पडत असल्याने सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
जालना राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारीतील पाथरी ते बोरगव्हाण या सात किलोमीटरसह सेलूतील साडेपाच अशा एकूण साडेबारा किलोमीटर लांबीच्या ५४८ (ब) महामार्गाचे काम सरस्वती कन्स्ट्रक्शन कंपनी (गुजरात) करीत आहे. शंभर कोटी रुपये खर्चाचे हे काम आहे. सात किलोमीटर लांबीच्या पाथरी ते बोरगव्हाण रस्त्याचे काम रखडत रखडतच सुरू आहे. डिग्रस बरसाले पाटी ते सेलूतील रायगड कॉर्नर जवळील रस्त्याच्या खोदकामानंतर चार-पाच महिने काहीच झाले नाही. आजही अर्धवट काम आहे, तर जिंतूर नाका ते पाथरी रेल्वे गेटपर्यंतचे कामही अपूर्ण आहे. खोदकामानंतर डिग्रस – सेलू रस्त्यावर धुळीचे साम्राज्य, खड्डे यामुळे वाहतूक अत्यंत जिकिरीची झाली. रस्त्याच्या माती कामांमध्ये मुरुमाऐवजी सर्रास आजुबाजुची काळी माती वापरली गेली. नंतर एका बाजूला थातूरमातूर सिमेंट भरुन बेस करण्यात आल्याच्या तक्रारी वाढल्या. शहरातील दोन्ही बाजूच्या सिमेंट क्रॉंकिटच्या नाल्याच्या कामाचा निकृष्ट दर्जाही उघडा पडला. पुलांची उंची, रस्ते कामाचा दर्जा आणि कामाचे नियोजन व गती यावरून सेलू तालुका दबाव गट व जागरूक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. बोगस कामाप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. याकडे संबंधित अभियंता, अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत, तर कंत्राटदाराकडून धिम्म्या गतीने काम कसेबसे पुढे रेटले जात आहे, असा आरोप करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसापासून सेलू शहरात काही ठिकाणी रस्ते खोदकाम सुरू आहे. वाहतूक आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने सर्वच कामे लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
ठेकेदार मनमानी पद्धतीने निकृष्ट दर्जाचे काम करीत आहे. अधिकारी कामाचा दर्जा तपासण्यासाठी हजरच नसतात. दोन वर्षांपासून साडे पाच किलोमीटरचे काम अजब पद्धतीने होत आहे. गुजराती ठेकेदारामुळे कामाचा दर्जा बघण्याची हिंमत कुणी करीत नाहीत. केंद्रीय रस्ते मंत्रालयापर्यंत वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आहे. काम गुणवत्ता राखून वेळेत पूर्ण केले जावे. – ॲड.श्रीकांत वाईकर, निमंत्रक, सेलू तालुका दबाव गट
दुधना कॅनॉलवरील पुलासह सहा पूलाचे काम व रस्त्याच्या एका बाजूचे क्रॉंकिटीकरण बहुतांश पूर्ण होत आले आहे. सेलूतील दोन्ही नाल्याच्या बाजूला मोकळ्या जागेवर अतिक्रमणे आहेत. काही समाजकंटक कामात अडथळा निर्माण करीत आहेत. कामगारांना मारहाणीचे प्रकार घडलेत. जून २०२४ पर्यंत कामाची मुदत आहे. पण, डिसेंबर २०२३ पर्यंत शहरातीलही काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. गुणवत्तापूर्ण कामाच्या दृष्टीने लक्ष ठेवून आहोत. – अभिजित घोडेकर, उपविभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग जालना